Wednesday, May 25, 2011

'ईश्वरी'

तिचा जन्म २५ ऑगस्ट २००० ला झाला.
माझा बर्थडे सप्टेंबरमध्ये अन तिचा ऑगस्ट म्हणजे माझ्या आधी येणार म्हणून मला सगळे चिडवायला लागले.
तिच्यात अन माझ्यात १२ वर्षांचे अंतर आहे.
ती जन्मली तेव्हा नांदेडच्या पाचलेगावकर महाराजांच्या मठातल्या गोविंद महाराजांकडून तिचे नामकरण 'ईश्वरी' उर्फ 'तपस्या' असे केले.
ईश्वरी हे देवीचे, म्हणजे आमच्या कुलदेवतेचे, तुळजाभवानीचे नाव म्हणून तिला ईश्वरीच म्हणतो..बाकी तपस्या फक्त शाळेच्या रेकॉर्डपुरते.
ती जन्मली तेव्हा मी परभणीला मावशीकडे शिकायला होते, उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदेडला आले तेव्हा ती ६ महिन्यांची झाली होती, इतके दिवस आम्ही एकमेकींना पाहिलेही नव्हते.
आधीपासून आई मला सांगायची कि ती खूप तडतडी झालीये, माणसं ओळखतेय अन आई-बाबांशिवाय कोणाजवळही जात नाही...मग मी जरा घाबरत घाबरतच तिला कडेवर घेतले..लाडाने जवळ घेऊन बोलायला लागले..
आश्चर्य म्हणजे ती अजिबात रडली नाही आणि मी तिला 'ओ..' म्हणाले, ती रिप्लाय द्यायला लागली 'ओ..' जितका वेळ मी 'ओ.. ' म्हणाले, तेवढा वेळ ती माझ्यापाठोपाठ 'ओ.. '
म्हणाली..हा प्रसंग अजूनही जसाच्या तसा मला आठवतो, अगदी पहिल्याच भेटीत तिने आपल्या बहिणीला ओळखले होते.
ती रांगायला लागली तेव्हा मात्र तिच्यावर जास्त लक्ष ठेवावे लागत असे.. बहिणीच्या ओढीमुळे मी हि नांदेडला शिफ्ट झाले.
मी शाळेत जायला निघाले कि तिला वाटायचे मी कुठेतरी बाहेर जातेय..मग ती अगदी बेडवर असली तरीही रांगत रांगत जवळ यायचा प्रयत्न करायची..एकदा-दोनदा ती पडलीही होती बेडवरून..पडली तरी धडपडत,रडत बाहेर येण्याचा प्रयत्न करायची.
आमच्या आजोबांना आम्ही 'नाना' म्हणतो, तेही आमच्यासोबतच राहतात.. दररोज रात्रीच्या त्यांच्या जेवणाच्या वेळेस रांगत आजोबांजवळ जाऊन म्हणायची,"नाना, बो..", म्हणजे 'नाना, बोलावलंय'..
एकदा माझे ट्युशनमधले सर घरी आले होते, ते मला अभ्यासावरून रागवायला लागले..तर हि उलट त्यांनाच 'ऑ.. उ..'असे काहीतरी बोलून रागवायला लागली..रागावणं सोडून सरही हसायला लागले.
आई-बाबा लाडाने दोघींनाही कधी कधी 'मन्या' म्हणतात..तेव्हा हिचे सुरु होते.."ऑ.. मी आहे मन्या..ती नाही.."
पण आई-बाबा बाहेरगावी गेले, कि तिचा मोर्चा माझ्याकडे वळतो.. तिला कितीही रागावले, कितीही मारले, तरीहि शेवटी ती जवळ येते..
ती कॉमेडीहि करते.. तिचा सेन्स ऑफ ह्युमरही चांगला आहे..
काही दिवसांपूर्वीच आमच्या शेजारी नवीन कुटुंब राहायला आले.. काकू कन्नडिगा अन काका मराठी..घरात बोलताना काकू कन्नड बोलायच्या..आपल्यात जसे नवऱ्याला हाक मारताना,'अहो..' म्हणतात, तसे कन्नडमध्ये, 'री..' म्हणतात..काकूही काकांना 'री..' म्हणून हाक मारायच्या..त्यांचा मुलगा, ध्रुव, आमच्याकडे इशुसोबत खेळायला आला.. आजोबांनी इशुला त्याचे पूर्ण नाव विचारले..त्यावर ती बोलली,"ध्रुव.. ध्रुव 'री' साखरे.."..घ्या..काकांचे नाव रवी आहे..हिला वाटले काकू 'री' म्हणतात म्हणजे त्यांचे नाव 'री'च आहे.. तेव्हापासून काकूंनी 'री' म्हणणे सोडून दिलेय..
मी सोडून तिच्यावर कोणीही हात उगारला तर मला राग येतो..आई-बाबा म्हणतात मी जरा जास्तच प्रोटेक्टिव होते तिच्याबाबतीत..
मला कधीही कुठल्याही गोष्टीसाठी अडवले गेले नाही..पण मी तिला अडवते..अगदी आई-बाबा तयार असले तरीही..कारण मला तिची काळजी वाटते..माहित आहे मला..सगळ्या एल्डर सिस्टर्स अशाच असतात..
एक गोष्ट मात्र मला मनापासून वाटते, कि ती आली म्हणूनच मी इंजिनिअर झालेय.. कारण मला मार्ग सापडला.. आपल्यावर कोणीतरी डिपेंड आहे.. आपल्या सावली सारखीच आपल्या मागे येणारी कोणीतरी आहे..हि जाणीव व्हायला लागली.. आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी मिळू शकल्या नाही.. ते सर्व तिला मिळावे अशी माझी इच्छा आहे..माझ्यापेक्षाही तिने शिकून खूप मोठे व्हावे.. असे वाटतेय.. मला माझ्या जगण्याची दिशा सापडलीये.. आणि शेवटी आम्हा दोघींना एकमेकिंचाच तर आधार असणार आहे ना..!!