Wednesday, September 26, 2012

लकी प्लांट

 
 
खरं तर माझा 'फेंग शुई' किंवा तत्सम गोष्टींवर जास्त विश्वास नाहीये..
 
पण तरीही मी एक फेंग शुई प्लांट विकत घेतला.. झालं काय, कि माझ्या जुन्या, म्हणजे आधीच्या ऑफिसमध्ये क्युबिकल(बे एरिया) डेकोरेशनची स्पर्धा होती.. आणि आम्ही थीम निवडली होती "गो ग्रीन"..  त्यासाठीच मी हा प्लांट विकत घेतलेला.. म्हटलं ऑक्सिजन मिळेल तेवढाच.. यासोबत घेतलेले बाकीचे सगळे प्लांट्स माझे कलीग्स त्यांच्या घरी घेऊन गेले.. हा एकच शिल्लक राहिला म्हणून मी माझ्या डेस्कवर ठेवून घेतला.. तेव्हापासून मी अतिशय जपून काळजी घ्यायचे त्याची.. वाळलेली पाने काढून टाकणे, दर आठवड्याला पाणी बदलणे, दररोज एक-दोन तास ऑफिसच्या खिडकीत सूर्यप्रकाशात नेऊन ठेवणे, इ.इ. चालू असायचं माझं.. मी कधी सुट्टीवर असले कि माझे कलीग्स आणि मित्र-मैत्रिणी त्याची काळजी घ्यायचे.. सुट्टीवर असतानाही फोनाफोनी चालायची.. तेव्हा ते आवर्जून सांगायचे प्लांटला पाणी घातलं, खिडकीत ठेवून परत जागेवर आणून ठेवलं.. वगैरे वगैरे.. 
 
दोन महिन्यातच प्लांट दीड फुटापर्यंत वाढला.. आम्हा सगळ्यांना त्याची सवय झाली.. तसे पाहता डेस्कवर कोणी नसताना (रात्रीच्या वेळेस) उघड्यावर ज्या ज्या वस्तू ठेवल्या जात, मग ते पेन, ग्रीटिंग कार्ड, नोटबुक, पाणी पिण्याची बॉटल.. काहीही असो..  त्या दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येईपर्यंत गायब होत असत.. पण हा प्लांट आमच्या बे एरिया मध्ये अजूनही टिकून होता.. 
 
असो.. मी जुन्या ऑफिसमध्ये पेपर टाकला(रीजाईन केलं हो..).. ज्या दिवशी माझा त्या ऑफिस मधला शेवटचा दिवस होता, त्या दिवशी मी सगळ्यांशी भेटून-बोलू घेतलं.. माझ्या डेस्क मधली एक एक वस्तू प्रत्येकाने ठेवून घेतली.. त्यात टेडी, वेलकम करणारा डॉगी, काही आर्चिसचे ग्रीटींग्स आणि बरंच काही होतं (त्यांनी मला म्युझिक प्लेयर भेट म्हणून दिलं, त्याच्यापुढे तर मी दिलेल्या वस्तू नगण्यच... पण तरीही त्यांनी त्या मागून घेतल्या..)
 
राहता राहिला प्लांटचा प्रश्न.. मी माझ्या टीममेटला सांगितलं, कि 'तोपर्यंत हे तुझ्याकडे राहू दे.. सात आठ दिवसांनी मी घेऊन जाईन इथून..' तिने तो तिच्या डेस्कवर ठेऊन घेतला.. दहा-पंधरा दिवस झाले तरी ती बया प्लांट देण्याचं नावच काढेना.. मी सुद्धा थोड्या काळासाठी विसरून गेले त्याला..
 
एव्हाना संपूर्ण ऑफिसमध्ये तो प्लांट फेमस झाला.. आमच्या बे एरियातून जाणारा येणारा प्रत्येकजण तिथे थांबून बघायचा.. कारण तो खूप वाढलेला.. जवळ जवळ दोन फुट... मी गेल्यानंतर एक नवीन म्यानेजर जॉईन झाला.. तो त्या प्लांट ला पाहून माझ्या टीममेटला सारखा म्हणायचा.. "ये प्लांट तो बहोत अच्छा है.. मुझे ऐसाही प्लांट ला के दो ना.." मग ती म्हणायची, "ये मेरा नही.. वर्षाका प्लांट है..." त्यावर तो म्हणायचा, "अच्छा.. जब भी वर्षा आएगी , तो उसे बोल देना के मुझेभी ऐसाही प्लांट चाहिये.." त्या बिचाऱ्याला बरेच दिवस कळलं नाही कि ऑफिस सोडून गेलीये ते.. मी सुट्टीवर आहे, असंच समजायचा तो.. आणि माझे फ्रेंड्स त्याची उडवायचे अशीच..
 
त्यानंतर एक महिना झाला.. माझ्या टीममेटने सुद्धा पेपर टाकला.. ती सुद्धा तो प्लांट माझ्या दुसऱ्या कलीग कडे ठेवून गेली... तो त्याची काळजी घ्यायला लागला.. जेव्हा जेव्हा भेटे तेव्हा तेव्हा प्लांट बद्दल सांगत असे.. पण आणून काही देत नव्हता.. झालं.. पंधरा दिवसात त्याने सुद्धा पेपर टाकला.. आणि तो प्लांट गेला माझ्या टीमलीडरकडे... आश्चर्य म्हणजे एका महिन्याच्या आत त्याने रीजाईन केलं.. सगळे माझ्या प्लांट बद्दल बोलायला लागले, कि 'ज्या ज्या व्यक्तीकडे तो जातोय ती ती व्यक्ती इथून पेपर टाकून निघून जातेय..' आम्ही एकाच टीम मधले ५ जण आधीच बाहेर पडलोय..
 
मला तर एका क्षणासाठी वाटले कि माझ्या एवढ्या चांगल्या प्लांट ला काय झाले असावे.. (कोणी करणी वगैरे तर नाही न केली त्याच्यावर.. हा सुद्धा विचार डोक्यात येऊन गेला.. म्हटलं अकरा वेळेस वल्गा सूक्त म्हणून उतरवून टाकेन त्याच्यावरून..) असो.. जोक्स अपार्ट.. कसाही असला तरी आमच्यासाठी नक्कीच लकी ठरला होता.. आमची प्रगतीच(हाईक) झाली होती.. कोणासाठी लकी तर कोणासाठी वाईट.. म्हणजे आमच्यासाठी लकी तर आमच्या जुन्या ऑफिस साठी वाईट (वाईटच म्हणावे लागेल.. एकापाठोपाठ एक एम्प्लोयीज सोडून जाऊ लागल्यावर काय म्हणणार आणखी..)
 
पुन्हा काही दिवसांसाठी मी विसरून गेले त्याला.. कारण, मी नसले तरीही कोणी ना कोणी त्याची काळजी घेतंच राहील एवढं पक्कं माहितीये..
 
आज परत अचानक मला माझा प्लांट आठवला.. कारण काय तर माझा एक मित्र दुपारी फोन करून एक-दीड तास बोलला.. काय काय सुरुये मी आणि माझे टीममेट्स सोडून गेल्यावर, हे सांगत होता.. सगळं बोलून झाल्यावर शेवटी म्हणाला, "मी कशासाठी फोन केला, ते सांगायचंच राहून गेलं कि... मी हे सांगण्यासाठी फोन केला, कि आज मी पेपर टाकलाय.. आणि..." मी कानांत प्राण आणून ऐकत होते.. आणि तो बोलून गेला..
 
"आणि.. तुझा प्लांट माझ्याकडे आहे सध्या..."

Saturday, August 25, 2012

एक भेट.. खूप काही शिकवून जाणारी..

 
आज वीकेंडचं कुठेच भटकायला गेले नाही म्हणून रुममध्ये बसून बोअर होत होतं.. शेवटी बाजूच्या रुममध्ये राहणारी माझी मैत्रीण गिटार क्लासला निघाली तेव्हा तिच्यासोबत गेले.. म्हटलं, मी ऐकेन बाहेर बसून किंवा मग वरच्या सीसीडीत जाऊन बसेन.. आमच्या पीजीच्या जवळच मारथहल्लीमध्ये आहे तो क्लास, 'द साऊन्ड्स ऑफ म्युझिक'.. 
 
मैत्रीण गेली आत गिटारच्या टीचरकडे.. बाहेर वेटिंगरूम सारखीच सोय केलेली होती, तिथे शिकायला येणाऱ्या लहान मुलांच्या पेरेंट्सना बसण्यासाठी म्हणून.. तिथेच जाऊन बसले.. तिथे कला क्लासेस, गिटार तसेच व्होकलचेही क्लासेस घेतले जातात, असं तिथल्या को-ओर्डीनेटरशी बोलताना कळले..
 
जिथे बसले होते त्याच्या मागच्या रूममधून संगीताचे सूर ऐकू येत होते.. सगळीच लहान मुले आणि एक टीचर गात होते.. त्यांना गायनाचा सराव करताना ऐकून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले.. माझे गुरु 'श्री कांजाळकर' यांची आठवण आली.. त्यांच्याकडे मी संगीत शिकायला जायचे.. हार्मोनियम शिकले आणि तबल्याचा सराव सुरु करणारच होते, पण बाबांची बदली झाली आणि मी परभणीला गेले.. त्यानंतर शिक्षणामुळे मी गायनाकडे पाठ फिरवली आणि आज आयटी क्षेत्रात आलेय.. या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या..
 
थोड्या वेळाने गायनाचा क्लास सुटला आणि सगळी छोटी छोटी मुलं त्यांच्या पेरेंट्सबरोबर बाहेर पडली.. मग पाठोपाठ त्यांची टीचरही आली.. रीना बासू.. वयस्कर असल्या तरी त्या वागण्या-बोलण्यात अतिशय चपळ.. नेमका आज त्यांना थोडा मोकळा वेळ भेटला म्हणून त्या येऊन बसल्या वेटिंगरूममध्ये.. त्यांच्याकडे गेले.. त्यांनी नाव विचारल्यावर म्हटलं, 'वर्षा' तर त्या आधी 'बरखा' म्हणाल्या, मग 'बर्षा' म्हणाल्या.. दोन-तीन वेळेस ट्राय केल्यावर कुठे 'वर्षा' म्हणाल्या.. मग थोडीफार चौकशी करून झाल्यावर आम्ही गायनावर आलो.. मी त्यांना म्हटलं, कि मला लहानपणी खूप आवड होती.. गायनावर डिस्कस करताना त्यांनी थोडीशी गाणी एकून दाखवली आणि मग मला कुठलंही एखादं माझ्या आवडीचं गाणं म्हणायला सांगितलं.. नेमकं त्या वेळेस मला कुठलंच आठवलं नाही.. शेवटी 'जय शारदे, वागेश्वरी' हे गाणं म्हणून दाखवलं.. त्यांनी त्यात राग, सूर, ताल, लय.. सगळ्यात इतक्या चुका काढल्या कि आम्ही खूप हसलो त्यावर.. 
 
त्यांनी खूप छान समजावून सांगितलं.. त्यांना मॉडेल बनण्याची इच्छा होती, पण त्या गायिका झाल्या.. आणि आता या वयात त्यांना ते शक्यही नाही.. मलासुद्धा म्हणाल्या, 'गायनासाठी संपूर्ण डेडिकेशन लागतं आणि खूप सराव करावा लागतो, जसं तुमच्या कामासाठी तुम्हाला धडपडावं लागतं, तसंच..' खूप बोलल्या काय व्हायचं होतं आणि काय झाल्या याबद्दल..
 
त्या पुन्हा पुढचा क्लास घ्यायला गेल्यावर मी परत आजुबाजुल्या बसलेल्या पेरेंट्सशी गप्पा मारायला लागले.. बोलता बोलता कळलं, कि रीना म्याडम एक खूप मोठ्या गायिका आहेत आणि बंगलोरमध्ये त्यांचं खूप नाव आहे.. त्यांचा एक क्लासिकल म्युझिक अल्बम सुद्धा येतोय जो सुधा मूर्ती(इन्फोसिसच्या फाऊण्डर)यांच्या पुढाकाराने लवकरच बाजारात येईल.. तेव्हा वाटलं, अरे एवढी मोठी व्यक्ती आपल्याशी एवढा वेळ बोलली.. त्यांनाही आयुष्यात जे व्हायचं होतं, ते त्या होऊ शकल्या नाहीत.. पण आज त्या ज्या क्षेत्रात आहेत त्यात अगदी समरसतेने आणि तेवढ्याच उत्साहाने काम करतात.. खूप कमी लोक असतात, ज्यांना आपल्या मनासारखं काम करायला मिळतं.. पण मग म्हणून रडत न बसता आपणही आहोत त्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतो.. रीना बासुंसोबतची छोटीशी भेट मला हेच शिकवून गेली..!!!

Wednesday, July 4, 2012

नम्मा कुर्ग ट्रीप (आमची कुर्ग ट्रीप)



बंगलोरला येऊन २ वर्षं झाली.. एक बंगलोर सोडलं तर जवळपासची कुठलीच ठिकाणं पहिली नव्हती.. खूप दिवसांची इच्छा होती, कि विकेंडला कुठेतरी जाऊन यावं.. शेवटी मागच्या आठवड्यात कुर्गला जायचा योग आला.. सौम्या, मी, ज्योती (सौम्याची रुममेट), प्रणिता आणि श्रावणी (सौम्याच्या मैत्रिणी).. सगळी तेलेगु पार्टी अन त्यांच्यात मी एकटी मराठी.. पण त्यांनी मला बोअर होऊ नये म्हणून जास्त करून हिंदी-इंग्लिश मध्येच संभाषण केलं..

सौम्याचं अन माझं केव्हाच ठरलं होतं, कि कुठेतरी फिरायला जायचं.. कोणी येवो न येवो.. आपण मात्र जायचं.. पुन्हा पुन्हा कुठे फिरायचा चान्स मिळेलच असं नाही ना..!!

एकदाचा मुहूर्त सापडला कुर्गला जाण्याचा..!! ज्योतीने तिच्या ओळखीने आम्हा ५ जणींसाठी एक क़्वालिस ठरवली.. आम्ही पहिल्यांदाच जात होतो आणि तेही फक्त ५ मुली आणि एक ड्रायव्हर.. रवी त्याचं नाव.. प्रॉपर कन्नडा.. तो मंड्याचा मुळचा.. गाडीत बसल्यापासून ते वापस रुममध्ये पाय ठेवेपर्यंत त्याने सर्वांची चांगली काळजी घेतली..

मी ऐनवेळेस, म्हणजे शुक्रवारी घरी सांगितलं कि मी कुर्गला जातेय म्हणून.. आई तर अगदी खूष झाली.. म्हणे, "पोरगी २ वर्षांनी का होईना बंगलोरच्या बाहेर तर पडतेय.. आम्ही आल्यावर आम्हालाही फिरवून आणता येईल.. तू बघून आली म्हणजे.." पण बाबांचं सुरु झालं.. "जास्त इकडे तिकडे फिरू नको.. मैत्रिणींना सोडून कुठे एकटी जाऊ नको.. पेप्पर स्प्रे जवळ ठेवलास ना?.. चाकू/पेपर कटर आहे ना जवळ? ड्रायव्हर विश्वासू आहे का?? तिथे नदीत/पाण्यात उतरू नकोस.. धबधब्याजवळ जाऊ नकोस.. दुरून पहा.." वगैरे वगैरे.. मला तर एक क्षण असं वाटलं, कि आई बाबा आहे आणि बाबा आई आहेत.. जे आई कडून ऐकायची अपेक्षा होती, ते बाबा बोलले अन जे बाबांना बोलायला पाहिजे होतं ते आई बोलली..

असो. शुक्रवारी रात्री आम्ही १० वा. आमच्या होस्टेलमधून निघालो.. रवी मारथाहल्ली जवळच आला होता आम्हाला न्यायला.. मग आम्ही निघालो कुर्गच्या दिशेने.. रवीने सगळी कन्नडा गाणी भरून आणली होती सोबत.. ती सुरु केली वाजवायला.. सोबत तो त्यांचे अर्थही समजावून सांगत होता.. त्याला कन्नडा, तामिळ, तेलेगु अन हिंदी.. एवढ्या भाषा येतात.. त्याने जुनी कन्नडा गाणी वाजवायला सुरु केल्यावर मात्र आम्हाला झोप यायला लागली.. रस्त्यात त्याचं शहर लागलं.. मंड्या - द शुगर सिटी.. तिथे एका ठिकाणी थांबून चहा घेतला.. कोणीतरी म्हणालं, "चुईंग गम खात बसल्यास झोप येत नाही.." खरे कि खोटे ते माहित नाही.. पण आम्ही कुशलनगरला पोहोचेपर्यंत सगळ्यांचीच दांडी गुल..!! म्हैसूर केव्हा गेलं अन आम्ही कुशलनगरला केव्हा पोहोचलो, ते कळलंच नाही.. 

शनिवारी पहाटे ३.३० वा. कुशलनगर गाठलं.. आधी तिथेच राहायचं ठरवलं.. तिथून २० किमी अंतरावर कुर्ग आहे.. सकाळी सकाळी फ्रेश होऊन जायचं ठरवलं, पण तिथे राहण्यासाठी रूम्स मिळाल्या नाही.. मग रवीने एक-दोन ठिकाणी फोन करून एका ठिकाणी रूम्स बुक केल्या.. ४ वा. आम्ही आमच्या थांबण्याच्या ठिकाणी पोहोचलो.. ते एक घरच होते.. खाली घरमालक आणि वर रूम्स.. पाठीमागे कॉटेजेस.. रूम्सचा रेंट डिनर आणि ब्रेकफास्ट वगळून म्हटलं तर २००० एका रूम साठी.. कॉटेज मात्र खास करून हनिमूनर्स साठी होतं आणि त्याचा रेंटही जास्त होता.. आम्ही रूम्स बघायला वर गेलो.. त्यावेळेस तिकडे लाईट गेलेली.. बाहेर रातकिड्यांचा आवाज.. आजूबाजूला सगळं जंगल.. आम्हाला तिथे थांबण्याची बिलकुल इच्छा नव्हती.. पण दुसरा काही इलाज नव्हता.. रूम्स मात्र मोठ्या आणि प्रशस्त होत्या.. २ कॉट एकमेकांना जोडले तर आम्ही पाचही जणी त्यावर अगदी आरामात झोपू शकू एवढ्या.. मग आमच्यासाठी एक आणि रवीसाठी एक अशा दोन रूम्स बुक केल्या.. घरमालकाने बत्त्या आणून दिल्या.. आम्ही फ्रेश होऊन सकाळी कुठून सुरुवात करायची ते ठरवत बसलो.. पहिल्या दिवसाचा प्लान बनवून थोडावेळ झोपायला गेलो.. सकाळी ६ वा. उठायचं ठरलं.. इथे माझी पंचाईत होती.. मला ब्रश करण्यापासून ते स्नान करून बाहेर यायला ४५ मी. लागतात..(सौम्याच्या भाषेत, 'अगदी तंतोतंत आणि शिस्तबद्ध करायची सवय आहे..') मग मी आधी आवरून घेतलं आणि मग एकेकीला उठवलं.. त्यांचं आवरून होईपर्यंत मी बाहेर फिरायला निघाले..

बाहेर आल्यावर बघितलं.. रात्री अंधारात जेवढं दिसलं होतं, त्यापेक्षा कितीतरी मोठं घर होतं.. "बालाजी व्हिला" त्याचं नाव.. तिथली हिरवळ, झाडे-झुडुपे, पाठीमागे अतिशय सुंदर कॉटेजेस, नारळाची बाग, स्विमिंग पूल, कॅम्प फायर साठी प्रशस्त अशी जागा, रात्रीच्या डिनरसाठी सुंदरसे सजवलेले शेड.. आणखी बरंच काही.. भरपूर मोठा पसरलेला परिसर होता.. तेव्हा वाटलं, कि रात्री थांबण्याचा निर्णय घेतला तो योग्यच होता..

सकाळचा चहा घेऊन.. तिथे थोडे फोटो काढून आम्ही निघालो.. कुशलनगरला ब्रेकफास्ट केला.. तिथली चवच वेगळी होती.. पहाडी टाईप.. इडली-सांबार सुद्धा आम्ही आवडीने खाल्ला.. मग पहिल्या प्लेसकडे निघालो.. "तलकावेरी", जिथे कावेरी नदी उगम पावते.. जाता जाता रवीने पुन्हा आपली कन्नडा गाणी सुरु केली.. यावेळेस गाणी थोडी लेटेस्ट आणि चांगली होती.. त्यातलं एक गाणं प्रेमलोका मुव्ही मधलं (कन्नडा मुव्ही: जुही चावला हिरोईन आहे..) त्याला आम्ही ब्युटी साँग म्हणतो.. कारण त्यात शेवटी 'ब्युटी' शब्द येतो.. मला अतिशय आवडलं ते..(लिरिक्स विचारू नका प्लीज..) जेव्हा जेव्हा मी रवीच्या बाजूला बसायचे, तो हे गाणं आवर्जून लावायचा.. बाकीच्या मुली पकून जायच्या.. "वो ब्युटी साँग मत लगाना प्लीज.. और तुम तो गाना चूज ही मत करना.." त्यांना सगळ्यांना माहित आहे.. मला थोडी antique गाणी(हा पण त्यांनीच दिलेला शब्द आहे..) आवडतात.. (जुडवा/कभी हां कभी ना मधली गाणी कितीजण ऐकत असतील बरं!!) असो. आम्ही तलकावेरीला पोहोचलो.. ते जवळपास ४०००फुट उंचावर आहे.. तिथे अतिशय दाट धुकं/ढग.. थंडगार वारं.. आम्ही रात्रभर झोपलेलो नव्हतो, तरी तिथे इतकं फ्रेश वाटलं, कि थकवा कुठल्या कुठे पळून गेला.. तिथे एक कुंड आहे, जिथून कावेरी उगम पावते.. त्या कुंडातून पाणी वाहत जाऊन एका दगडी नंदीच्या मुखातून बाहेर पडतं.. तिथून मग थोड्या दूर अंतरावरून खाली वाहायला सुरुवात होते.. तिथे फक्त नंदीच्या मुखातून बाहेर येणारं पाणीच दिसतं.. त्यानंतर ते कुठून वाहतं, ते दिसत नाही.. कारण एकतर ढग आणि दुसरं गर्द हिरवी झाडी.. आम्ही ढगांमध्ये पूर्ण भिजून गेलो.. तिथे थोडावेळ थांबून, फोटोज काढून निघालो पुढे..

तोपर्यंत दुपार झाली होती.. तरी आम्हाला भूक लागली नाही.. सोबत चिप्स, स्वीट्स आणि थोडंफार खाण्यापिण्याचं सामान होतंच.. मग काय फिरण्याच्या नादात त्याच्यावरच भागवलं.. तिथून गेलो अब्बी फाल्सला (Abbi falls).. कावेरी नदीवरचा अतिशय सुंदर धबधबा आहे.. पण तिथे पाण्यात उतरायला परवानगी नव्हती.. तिथल्या झुलत्या पुलावर चढलो आणि फोटोज काढले.. आसपास फिरून वापस गाडीत येऊन बसलो.. जिथे जिथे जाल, तिथे तिथे केवळ कावेरी नदी दिसेल.. संपूर्ण कर्नाटकला पाणी पुरवठा करणारी फक्त कावेरी मुख्य नदी आणि तुंगभद्रा उपनदी आहे.. (कृष्णा कुठे गेली, हे महाराष्ट्र सरकारला नाहीतर कर्नाटक सरकारला विचारा..)

दरम्यान आम्हाला रात्रीच्या जेवणाबद्दल बालाजीवाल्याला लवकरात लवकर कळवायचं होतं.. म्हटलं, "एवढ्यात काये? सांगू ना आरामात.. अजून वेळ आहे.." "नाही नाही.. त्याला म्हणे आठ वाजण्यापूर्वी कॅम्प फायर साठी सगळी अरेंजमेंट करावी लागते.. जर आठच्या आधी असेल तर तसं सांगता येईल ना.." "अस्सं.. मग त्याला म्हणावं, तू आठच्या आधी तयारी करून ठेव कि.. कोण नाही म्हणतंय.. आम्ही आमचं जेव्हा येऊ तेव्हा जेवू.." त्यावर सगळे हसले.. त्याला फोन करून सांगितलं कि आम्ही डिनर घरीच करणार म्हणून..

त्याला कळवल्यानंतर आम्ही निघालो ओम्कारेश्वरा टेम्पलकडे.. एव्हाना खूप जोरात पाऊस सुरु झालेला.. तिथे पूजा करून, थोडे फोटो काढून येईपर्यंत आम्ही पूर्ण भिजलेलो.. तसेच निघालो पुढे..


पुढची प्लेस होती "राजा'ज सीट".. तिथे गेल्यावर कळलं कि ते गार्डन आहे.. तिकीट ५ रु. प्रत्येकी.. भर पावसात आम्ही गार्डन मध्ये फिरत होतो.. मध्येच छत्र्या उलट्या होत होत्या तुफान वाऱ्यामुळे.. "इथे कुठेच राजाची सीट नाहीये.. मला वाटलं खुर्ची किंवा तसं काहीतरी असेल..", कोणीतरी बोललं.. "इथे राजा सगळीकडे थोडा थोडा वेळ बसला असेल.. मग किती ठिकाणी बांधतील खुर्च्या.. म्हणून इथे तसं काही नाहीये..", दुसरी मस्करी करत बोलली.. तिथे बाजूलाच मिनी ट्रेन होती फिरायला.. त्यात फिरलो.. गरम गरम गोबी मंच्यूरीअन खाऊन वापस निघालो.. तेव्हा सात वाजले होते संध्याकाळचे.. 

जाता जाता सौम्या अन ज्योतीने रवीच्या मागे लागून एक व्होडकाची क्वार्टर आणि सोबत काही snacks मागवले.. त्या दोघींना टेस्ट करायची होती.. खरं तर आमच्यापैकी कोणीही कधीच घेतलेली नाहीये.. पण त्या दोघींना लहर आली.. झोपण्यापूर्वी जेव्हा त्यांनी एक एक सिप घेतला.. त्यांच्या घशात कसंतरी व्हायला लागलं.. मग माझी, श्रावणीची आणि प्रणीताची धावपळ झाली त्यांना लिंबू पाणी बनवून द्यायला.. मी त्या व्होडकाचा वास घेतला अन म्हटलं, "ए, माझ्याकडे जे dettol hand sanitizer आहे ना.. त्याच्यासारखाच वास आहे.. एखाद्या केमिकल पेंट सारखा.." त्यावर सौम्या मारायलाच धावली मला.."मूर्ख.. आधी वास घेता येत नव्हता का तुला.. तेव्हाच सांगितलं असतं तर.." "ए.. तुला व्होडका कोणी सांगीतला घ्यायला.. प्यायची एवढीच इच्छा होती तर जे झेपेल ते प्यायचं ना.." शेवटी काय तर ती बॉटल जशीच्या तशी सौम्याच्या मित्रांकडे गेली.. एन्जॉय करा म्हटलं..!!

रात्रीचे जेवण खूप छान होते.. डिनरसाठी तिथे सेपरेट छोटंसं शेड बनवलेलं होतं.. तिथली लाईटिंग, टेबलांची रचना वेगळी आणि सुंदर होती.. जेवताना त्याने गाणीसुद्धा नवीन आणि थोडी आदिवासी/नेपाळी टाईप लावली होती.. जेवणानंतर त्याने कॅम्प फायरच्या ठिकाणी नेलं.. आधीच सगळं जमवून ठेवलं होतं, फायर पेटवून तो गेला..आश्चर्य म्हणजे, तिकडे रोज पाऊस पडत असताना ते लोक वाळलेली लाकडे कुठून आणत असतील..!! आम्ही सगळे भोवती बसून अंताक्षरी खेळायला लागलो.. तेलेगु, हिंदी आणि मराठी भाषेतल्या गाण्यांमुळे अंताक्षरी चांगलीच रंगली.. मला वाटलं, माझ्या मराठी गाण्यांमुळे त्या बोअर होतील.. पण सौम्याने तर आश्चर्याचा धक्काच दिला.. तिला 'मुंबई-पुणे-मुंबई' मुव्ही मधलं 'कधी तू..' हे गाणं अतिशय आवडतं म्हणाली.. "आज कल तुम लगाते ही नहीं वो साँग.. " असं खेळता खेळता रात्रीचे ११वाजले, आम्ही रुममध्ये झोपायला गेलो.. रुममध्ये गेल्यावर लक्षात आलं कि डोकं पूर्ण भिजलं होतं.. फायरच्या जवळ बसल्यामुळे थोडा थोडा पाऊस सुरु झालेला सुद्धा कळाला नव्हता.. तर असा आमचा शनिवार तिथेच संपला..

रविवारी सकाळी ५ वाजता उठून तयार होऊन ६.३०ला सगळं समान घेऊन 'बालाजी व्हिला' सोडलं.. जाता जाता त्या मालकाचं बिझनेस कार्ड घेऊन, त्याला पुन्हा येऊ असं सांगून निघालो..


रविवारचं पहिलं स्थळ होतं 'दुबारे'.. तिथे रिव्हर राफ्टींग आणि एलिफंट राईड करता येते.. तिथेच नाश्ता केला.. तेवढा चांगला नव्हता म्हणून रात्री व्होडका सोबत खायला नेलेले snacks तिथे खाल्ले.. मग चप्पल-बूट, सामान गाडीतच सोडलं आणि निघालो राफ्टींग साठी.. लाईफ जाकेट आणि हेल्मेट चढवलं.. आणि आमची ५ जणींची स्वारी निघाली छोटी नाव वल्हवत.. सोबत आलेल्या नाववाल्याने आधीच सूचना देऊन ठेवल्या होत्या.. "फोरवर्ड म्हटलं कि पाणी मागे ढकला.. backward म्हटलं कि पुढे.. relax म्हटलं कि सगळं वजन नावेच्या आतल्या बाजूला झुकवून बाजूची दोरी घट्ट पकडायची.. खासकरून जेव्हा पाण्यात ट्विस्ट आणि टर्न येतं तेव्हा असं करायचं.." त्यानुसार आम्ही जात होतो.. रस्त्यात कित्येक प्रकारचे पक्षी, झाडे दिसली.. थोड्याश्या संथ पाण्याच्या जागी आल्यावर तो म्हणाला, "आता टाका उड्या पाण्यात.." आम्ही घाबरलो.. म्हटलं वेडबिड लागलंय का काय याला.. आम्हाला पोहता येत नाही अन हा चक्क एवढ्या मोठ्या नदीत उतरा म्हणतोय..?? आम्ही थांब थांब म्हणेपर्यंत त्याने सर्वांना ढकलले सुद्धा.. पाणी जास्त खोल नव्हते.. जास्तीत जास्त १०-१५ फुट असेल.. कुठे कुठे खडक पायाला लागत होता.. लाईफ जाकेटच्या सहाय्याने आणि सोबत बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने आम्ही खूपवेळ खेळलो.. मग त्याने आम्हाला एकेकीला नावेत ओढून घेतलं.. सात किलोमीटर पर्यंत राफ्टींग करून वापस आलो.. मग कपडे बदलून फ्रेश होऊन पुढे निघालो.. एलिफंट राईड साठी मात्र थांबू शकलो नाही.. कारण राफ्टींग मध्ये आम्ही खूप वेळ घालवला होता..

मग तिथून गेलो 'निसर्गधाम'ला एन्ट्री तिकीट होते प्रत्येकी १० रुपये.. आतमध्ये पुन्हा झुलता पूल, ट्री-हाऊस, काही प्राणी, पक्षी पहिले.. तिथे सुद्धा एलिफंट कॅम्प आहे.. पण पाऊस सुरु झाल्यामुळे त्यांनी बंद केला.. मग बाहेर शॉपिंग करून पुन्हा कुशलनगरला येऊन तिथल्या हॉटेलमध्ये जेवलो.. 

पुढे गेलो गोल्डन टेम्पलला.. ते बौद्ध लोकांचं विहार आहे.. जास्त करून तिबेटीअन शैलीत बांधकाम आहे.. खूप मोठं टेम्पल.. मध्यभागी गौतम बुद्धांची मूर्ती आणि आजूबाजूला काही बौद्ध देव-देवतांच्या मुर्त्या होत्या.. तिथे थोडावेळ बसून.. तिथल्या बौद्ध भिक्षुकांचे फोटोज घेऊन निघालो.. बाहेर गरम गरम कणसं खायला मिळाली.. तसल्या वातावरणात कणसांची मजा लुटताना काय छान वाटलं म्हणून सांगू..!!

तोपर्यंत ५ वाजत आले होते.. अजून म्युझिअम, फोर्ट, नागरहोल फोरेस्ट, इ. पहायचं राहिलेलं.. पण सगळं ६वाजता बंद होतं.. मग सरळ गेलो 'इदमुरी फाल्स' ला.. तो एक धबधबा नसून नदीवर एक बांध बांधलेला आहे.. तिकडे थोडेसे फोटो काढले.. कुर्ग फिरायचे म्हटल्यावर २ दिवस पुरणार नाहीत.. कमीत कमी ३ दिवस लागतात.. जे जे पहायचं राहिलं ते पुढच्या वेळी पहायचं आणि त्यावेळी जास्त दिवस सुट्टी घेऊन यायचं असं ठरवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो..

वाटेत पुन्हा मंड्याला चहा आणि खाणेपिणे केले.. संपूर्ण प्रवासात रवीने आम्हाला कन्नडा बोलून बोलून पकवलं.. बाकीच्या चार जणींना कन्नडा येतं.. कारण तेलेगु-कन्नडा सिमिलर आहेत.. शेवटी त्याने मला बोलायला भाग पाडलं.. "सर्वांना कन्नडा येतं.. तुम्हालाही निदान एक वाक्य बोलावं लागेल.." सगळे आग्रह करायला लागले.. मग मी म्हणाले.."तुंबा मज्जा माडद्वे((आम्ही) खूप मज्जा केली)".. रवी तर एवढा खुश झाला.. "तुम्ही जर असाच कन्नडा बोलत राहिलात ना तर तुम्हाला मी एक ट्रीप माझ्यातर्फे फ्री मध्ये नेऊन आणायला तयार आहे.. जसा तुम्हाला तुमच्या भाषेचा अभिमान आहे तसाच आम्हालाही वाटतो.." अगदी बरोबर बोलला तो..!!

रात्री १०.३०वा. बंगलोरात पोहोचलो.. बनशंकरीहून जाता जाता तिकडच्या Woody's मध्ये गेलो.. आणि खास रवी साठी म्हणून सर्वांनी कन्नडा स्पेशल "बीसीबेळेभात" खाल्ला.. एक एक करून सर्वांना सोडून मारथहल्लीला पोहोचलो.. उतरताना मात्र आम्ही रवीकडून कन्नडा गाणी आठवणीने कॉपी करून घेतली.. आणि आमच्या पुढच्या प्रवासासाठी त्यालाच ऑर्गनायझर म्हणून ठरवून टाकलं..

खरंच.. कुर्गच्या निसर्गाच्या प्रेमातच पडलेय मी.. तिथला निसर्ग, कावेरी, डोंगररांगा.. मनाला वेड लावून गेल्या.. परत यायला मनच होत नाही तिथून.. या ट्रीपने मला पूर्णपणे बदलून टाकलंय.. मी निश्चय केलाय, कि आपण आयुष्यभर तर इथे राहणार नाहीत.. मग निदान जेवढे दिवस इकडे आहोत, तेवढे दिवस तरी इथली माती, भाषा, संस्कृती पाहून घेऊया..म्हणजे इथल्या आठवणींचा सुगंध आयुष्यभर मनात दरवळत राहील..!! 

Saturday, April 21, 2012

एक आठवणींतला प्रवास..



आपण दररोज कुठे ना कुठेतरी प्रवास करतच असतो.. मग तो कधी जवळचा असतो, तर कधी लांबचा..

सध्या माझ्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे बंगलोर-नांदेड प्रवास.. खरं तर बंगलोर-नांदेड, मुंबईमार्गे, फ्लाईट असूनही मला नेहमी बस-ट्रेनने जायला आवडतं.. त्यातच तर खरी मज्जा आहे..
मला नेहमी आठवणींत राहणारा प्रवास म्हणजे ऑगस्ट २०११, लास्ट वीकमध्ये मी नांदेडला गेले होते तो..
तेव्हा आईचं एका कानाचं ऑपरेशन होतं.. आणि आई-बाबांनी आणि घरातल्या कोणीही मला सांगितलं नव्हता.. केवळ ह्यासाठी कि मी विनाकारण काळजी करू नये..

पण मला मामाकडून समजलं.. नांदेडमधले कान, नाक, घसा तज्ञ, डॉ. नचिकेत देशमुख हे आम्हांला अगदी घरच्यासारखे आहेत.. मी त्यांना फोन करून कन्फर्म करून घेतलं.. आणि त्यांना आई-बाबांना आणि घरी कोणालाही सांगण्यास मनाई केली.. म्हटलं मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे.. 

डॉक्टरांना तर सांगितलं.. पण आता पंचाईत होती.. कारण मी तिकीट बुक केलेलं नव्हतं.. माझा नेहमीचा ठरलेला प्रवास म्हणजे, बंगलोर ते हैदराबाद धनुंजयची वोल्वो, जी मारथहल्लीहून रात्री ८ वा. निघते.. आणि सकाळी ६.३०-७ वा. लकडी का पूल ला पोहोचते.. तिथून मग ताबडतोब एखादा ऑटो पकडून काचीगुडा रेल्वेस्टेशन गाठायचं.. ७.३० वा. काचीगुडा-अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस आहे, जी दुपारी १.३०-२ च्या सुमारास नांदेडमध्ये येते.. म्हणजे मी धनुंजयचं २८ ऑगस्टचं आणि ट्रेनचं २९ ऑगस्टचं ताबडतोब तिकीट बुक केलं.. आईचं ऑपरेशन ३० तारखेला होतं..

सगळ्यात कहर म्हणजे धनुंजयची बस कॅन्सल झाली.. त्यांनी मला २७ तारखेला कळवलं..(तरी बरं..!! ऐनवेळी सांगितलं नाही ते..) मग माझी शोधाशोध सुरु झाली.. बरं मला हैदराबादमध्ये सकाळी ७च्या आधी पोहोचणाऱ्या गाड्याच पहायच्या होत्या.. सगळीकडे शोधून शेवटी एक शर्माची बस भेटली.. जी ८वा. निघते आणि सकाळी ५.३०ला लकडी का पूलला पोहोचते.. म्हटलं चला.. भेटली एक गाडी..

पण प्रॉब्लेम्स अजून संपले नव्हते.. नेमकं त्यादिवशी ऑफिसमध्ये डाटाबेसचा डायरेक्टर ऑनसाईटवरून  आला अन ६.३०च्या सुमारास त्याने मला अन माझ्या म्यानेजरला मिटिंगसाठी बोलावलं.. मी तर एकदम प्यानिक.. आणि क्रिटीकल रिसोर्स असल्यामुळे ते मला सहजासहजी सोडणार नव्हते.. शेवटी त्यांना माझी परिस्थिती समजावून सांगितली.. माझा ल्यापटोप एका फ्रेशर मुलीजवळ देऊन तिला थोडं काम  समजावून सांगितलं..

मग ८वा. प्रवास सुरु झाला.. पण नेमकी गाडी एवढी स्लो होती कि, हेब्बाळपर्यंत पोहोचायला ११.३० वाजले. हेब्बाळ, बंगलोरचा सगळ्यात बाहेरचा एरिया.. तिथून हैदराबाद ८ तास लागतात.. माझं टेन्शन अजून वाढलं.. गाडी जशी हेब्बाळ मध्ये आली, ए.सी. बिघडला.. लोक गोंधळ करायला लागले.. म्हणे एकतर ए.सी. आत्ताच्या आत्ता ठीक करा.. नाहीतर गाडी पुढे जाऊ देणार नाही.. मग काय.. इंटरसिटी गेली माझी.. गाडी हेब्बाळमधून निघाली १.३०ला..मग कसची पोहोचतेय लवकर..९ वाजवले सकाळचे!!

सकाळी सकाळी बंगलोरच्या सगळ्या फ्रेंड्सशी फोनाफोनी झाली.. म्हटलं देवगिरी एक्स्प्रेसचं तिकीट चेक करा.. वाटलं नेमका त्याचवेळेस माझा ल्यापटोप माझ्याजवळ नसावा का..! देवगिरीचं तिकीट भेटलं नाही, कारण रिझर्वेशन चार्ट तयारच झाला होता..

आता कसं करणार?? मग माझी रूममेट, सौम्या हैदराबादची आहे.. ती सुद्धा ट्रेनने निघालेली होती.. तिला फोन केला.. ती सुद्धा सकाळीच पोहोचली होती.. तिच्या बहिणीचं घर कुकटपल्ली मध्ये होतं.. ती म्हणाली, "इकडे ये.. फ्रेश  हो.. देवगिरीचं जनरलचं तिकीट काढून तुला बसवून देऊ.."

मग तिच्या घरी गेले.. फ्रेश झाल्यावर तिच्या आईने गरम गरम पेपर डोसे खाऊ घातले.. "ऐसा कोई सौम्या का फ्रेंड आये तो हमको अच्छा मालूम होता.." ती हैदराबादी हिंदीत बोलली..
तिच्याघरापासून सिकंदराबाद पाऊण तासाच्या अंतरावर होतं.. गाडी १.३०ची होती.. ११वा. आम्ही घरातून निघणारच होतो कि.. जबरदस्त पाऊस सुरु झाला.. 

"आता ट्राफिक खूप वाढलं आहे बाहेर.. आपण १.३०पर्यंत नाही पोहोचू शकणार..", सौम्या म्हणाली.. खरं तर तो तिचाच प्लान होता.. मी तिच्याकडे थांबावं.. एक दिवस राहून मग दुसऱ्या दिवशी नांदेडला जावं..
"आजचा दिवस इथे राहा.. हैदराबादमध्ये फिरुया.. मग उद्या सकाळी इंटरसिटीने जा.. तुझ्यासाठी उद्याचं तिकीट अगोदरच काढलंय आम्ही.. तुला सरप्राईज द्यायचं आहे ना.. मग उद्या ऑपरेशन झाल्या झाल्या दे ना.. आणि असंही तू कधी आली नसतीस.."

मग तीने हैदराबादमध्ये कुठे कुठे फिरवलं.. शोप्पिंग.. खाणं.. ती होती म्हणून मी ही रीलाक्स झाले.. मी नांदेडला जाऊन सांगेपर्यंत आई-बाबांना यातलं काहीच माहिती नव्हतं.. त्यांना फोनवर बोलतानासुद्धा मी बंगलोरमध्येच आहे असं वाटत होतं..

दुसऱ्या दिवशी सकाळी इंटरसिटीत बसले तेव्हा कुठे जीवात जीव आला.. शेवटी नांदेडच्या दिशेने प्रवास सुरु झाला.. २वा. घरी पोहोचले.. आजोबा आणि ईशु घरीच होते.. आईच्या मोबाईलवर फोन केला.. ती नेमकी स्ट्रेचरवर होती.. तरी ऑपरेशन सुरु झालेला नव्हतं.. तिने फोन उचलला आणि काहीच झालेलं नाही.. अशा अविर्भावात बोलत होती.. "आता तरी सांग गं.. मी घरी आलेय.."

तिचा विश्वासच बसत नव्हता.. शेवटी आमच्या कामवालीने फोनवर सांगितले कि 'वर्षाताई आल्यात'.. ईश्वरी सुद्धा बोलली, तेव्हा कुठे तिचा विश्वास बसला..
लगेचच फ्रेश होऊन मी दवाखान्यात गेले.. तिच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं ते.. "आता माझं बाळ आलंय.. मला आता काही भीती नाहीये.." म्हणाली.. ऑपरेशनसुद्धा व्यवस्थित पार पडलं.. तिला त्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला.. मग ८ दिवस तिला आराम करता यावा म्हणून मी आणि बाबांनी ईशुच्या मदतीने घरातली सगळी कामं सांभाळली..

परतीच्या प्रवासात मात्र काही अडचण नाही आली.. दुपारी २.३०ची इंटरसिटी अन रात्री १०.३०ची धनुंजयची बस.. सोपा सरळ प्रवास होता.. पण नांदेडला जातानाचा प्रवास मात्र एक नवीन अनुभव आणि अविस्मरणीय आठवणी मनात ठेवून गेला.. 

आजही मी धनुंजयने हैदराबादपर्यंत आणि इंटरसिटीने नांदेडला जाते.. आता हैदराबाद म्हणजे अगदी आपल्या एरियात आल्यासारखं वाटतं.. अगदी रात्री बेरात्रीही मी हैदराबादमध्ये एकटी फिरू शकते एवढी हिम्मत माझ्यात आलीये..

नेमकं माझा प्रवास सुरु होण्याआधी एकदोघांनी मला म्हटलं होतं.. 'धनुंजयची बस नाहीये म्हणजे तू ट्रेन मिस करणार हे नक्की.. कुठलीही बस वेळेवर पोहोचत नाही..'

पण आता या प्रवासाची सवय झालीये.. आणि मी तो एन्जोयही करते.. नेहमीचा कंटाळवाणा प्रवास काय कोणीही करतात.. शेवटी कधी कधी बस/ट्रेन मिस करणे, अगदी धावत धावत गाडी पकडणे.. यातच तर प्रवासाची खरी मजा आहे..!!

Saturday, March 3, 2012

पीजी-पेइंग गेस्ट



यावेळेस नवीन वर्षाची सुरुवात नवीन पीजी (पेइंग गेस्ट/होस्टेल) मध्ये शिफ्ट होऊन केली..


जुन्या पीजी मधले जवळपास सगळेच इकडे शिफ्ट झालेत.. खरं सांगायचं तर सुरुवात काही चांगली झाली नाही..
माझी जवळची मैत्रीण अन जुन्या पीजीची मालकीण(आंटी) यांच्यात अडव्हांस रिफंडवरून जबरदस्त भांडण झालं..
आंटीशी माझं कधी कुठल्याही गोष्टीवरून भांडण झालेलं नव्हतं.. दोघींमध्ये कोणाची बाजू घ्यावी हा सर्वात मोठा प्रश्न होता..
तसं दोघींचाही बरोबर होतं म्हणा.. २ महिन्यात पीजी बंद होणार असल्यामुळे आंटीला रिफंड देणे रास्तच होते.. आणि पिजीचा नियम होता, सोडून जाण्यापूर्वी ३० दिवस आधी सांगितले पाहिजे, नाहीतर रिफंड मिळणार नाही..

शेवटी मी माझ्या मैत्रिणीला अन बाकीच्या मुलींनी आंटीला आवरले.. दोघीही हमरी-तुमरीवरून एकमेकींना मारण्याच्या तयारीत होत्या.. २ वर्षांत जेवढ्या शिव्या, भांडणं(मराठी-तेलेगु मातृभाषेत) पहिली/ऐकली नसतील तेवढी सगळी भर एका भांडणाने भरून काढली होती..
आपण त्यात इंव्होल्व्ह नव्हतो, तरीही सतत वाटत राहिलं.. असं व्हायला नको होतं..
असो. 


जुना पीजी काडूबीसनाहल्ली(माहितीये.. खूप अवघड आहे.. हल्ली म्हणजे गाव.. बँगलोरमध्ये एरीयांची नावे अशीच आहेत..) मध्ये होता, तर नवीन मारथहल्लीमध्ये(मला तर हा अपभ्रंश वाटतो.. मराठाहल्ली असेल पूर्वी, स्पेलिंग पाहून मराठी माणूस असेच वाचेल..)


नवीन पीजी मध्ये जेवण चांगलं आहे.. बँगलोरमध्ये जेवण सोडलं तर दुसरं कशाचाही टेन्शन नाही..
म्हटलं, चला जे झालं ते झालं.. आता आनंदात राहू नवीन ठिकाणी..
पण कसचं काय..!! आमच्या थ्री शेअरिंगच्या रूममध्ये माझ्यानंतर शिफ्ट झालेली मुलगी 'पाहुणे' सोबत घेऊन आली..(बेडबग्स.. अरे देवा.. आयुष्यात कधी पहिले नव्हते..)
आधी २-३ दिवस काही जाणवलं नाही.. नंतर जे झोप उडाली.. ते महिनाभर पीजी ओनर च्या मागे लागून लागून सगळी क्लिनिंग करून घेईपर्यंत..


मध्यंतरी ओनरने त्या मुलीलाही पीजी सोडून जायला सांगितले.. विनाकारण मला अन माझ्या रूममेटला सगळं झेलावं लागलं.. पेनच्या झाकणापासून ते कपाटाच्या कोपऱ्यापर्यंत सर्व स्वच्छ करून घेतलं.. तरी बरं.. जास्त पसरण्यापूर्वीच खबरदारी घेतली ते.. तेव्हापासून आम्ही दर वीकएंडला साफसफाई करतोय रूमची.. उगाचच कशाला रिस्क घ्यायची..!!


तो एक महिना मी आयुष्यभर विसरू शकत नाही.. आमची रूम रात्री आम्हांला अतिशय भयानक जाणवायची.. एखाद्या हॉरर मुव्हीतल्या रुमपेक्षाही भयानक.. पंखा खूप भयानक आवाज करायचा.. भिंतीवर हळू हळू वरच्या दिशेने २-४ चालणारे बग्स दिसायचे.. आम्ही शस्त्र (स्प्रे) घेऊन त्यांना मारायला धडपडायचो.. रोज रात्री कापूर/नेफ्थालीन बॉल बेडच्या चारही साईडना ठेवायचो, अंथरुणावरही फिरवायचो.. त्यातच शेजारचं कुत्रं रात्रभर भुंकायचं .. त्याने आणखी भर.. तो कुत्रा जर मालकाशिवाय, एकटा फिरताना कोणाला सापडला ना.. त्याला कोणी जिवंत सोडतील कि नाही अशीच शंका येते, कारण तो भुंकतोच तेवढा.. मालकही लक्ष देत नाही त्याकडे.. बिचाऱ्याची दयाही येते..


सर्व कपडे, अंथरूण, वस्तू.. सगळं गरम पाण्यात धुवून, रूमचा कोपरान कोपरा स्वच्छ करून.. आठ दिवस सगळं सामान, कपड्यांसह उन्हात वाळवायला लागलं..
अजूनही खबरदारी म्हणून अधून मधून सगळं उन्हात ठेवतो..


आता थोडे चांगले दिवस आलेत.. एक महिन्यात एवढं काही घडून गेलंय कि आम्हांला आता इथे येऊन ६-७ महिने झाल्यासारखं वाटतंय..
पीजी ओनरनेही थोडेफार चेंजेस केलेत.. वाशिंगमशीन आणलंय.. इंवर्टर बसवलाय.. प्रत्येक रूममध्ये टीव्ही आहे.. वाय-फाय आहे.. आणखी काय पाहिजे..!!


पीजी बद्दल ऑफिसमध्ये जेव्हा जेव्हा गॉसिप निघतं.. तेव्हा तेव्हा सगळे विचारतात..'अपार्टमेंट मध्ये का नाही राहत.. आपले पीजी मधलेच ३-४ रुममेट गोळा करून १०-१२ हजारांत एक चांगलं अपार्टमेंट मिळेल..' बरेचसे कलीग्स त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात.. त्यामुळे ते अपार्टमेंट, हाउस प्रेफर करतात..
पण जे जे कलीग्स पीजी मध्ये राहतो.. आमचं एकाच उत्तर असतं, 'आता सवय झाली पीजी मध्ये राहण्याची.. इथे सिक्युअर वाटतं..'


अपार्टमेंट मध्येही सिक्युरिटी असते.. पण पेरेंट्सना कोण समजावणार? त्यांच्यापसून एवढे दूर, त्यांना आपण पीजी मध्ये राहणं जास्त सेफ-सिक्युअर वाटत असेल तर तेच ठीक आहे..
आणि पीजी मध्ये नेहमी नवीन नवीन मैत्रिणी भेटतात.. जर रूममेट्स गावाला, घरी गेल्या तरी सतत कोणीना कोणीतरी असतंच कि पिजीमध्ये..सगळे एकदाच गावाला थोडीच जाणारेत.. मग ते दुसऱ्या रुममध्ये, दुसऱ्या फ्लोअरवर का होईना.. एकटेपणा तेवढाच कमी वाटतो..


माझे कलीग्स कधी कधी असेही चिडवतात, 'जर तुला पगारवाढ झाली.. चांगली ५०% हाईक झाली.. तरीही पीजी मध्येच राहशील??'
माझं एकाच उत्तर असतं,
'अगदी १००% हाईक झाली तरी पीजी मध्येच राहणार..'