Saturday, March 3, 2012

पीजी-पेइंग गेस्ट



यावेळेस नवीन वर्षाची सुरुवात नवीन पीजी (पेइंग गेस्ट/होस्टेल) मध्ये शिफ्ट होऊन केली..


जुन्या पीजी मधले जवळपास सगळेच इकडे शिफ्ट झालेत.. खरं सांगायचं तर सुरुवात काही चांगली झाली नाही..
माझी जवळची मैत्रीण अन जुन्या पीजीची मालकीण(आंटी) यांच्यात अडव्हांस रिफंडवरून जबरदस्त भांडण झालं..
आंटीशी माझं कधी कुठल्याही गोष्टीवरून भांडण झालेलं नव्हतं.. दोघींमध्ये कोणाची बाजू घ्यावी हा सर्वात मोठा प्रश्न होता..
तसं दोघींचाही बरोबर होतं म्हणा.. २ महिन्यात पीजी बंद होणार असल्यामुळे आंटीला रिफंड देणे रास्तच होते.. आणि पिजीचा नियम होता, सोडून जाण्यापूर्वी ३० दिवस आधी सांगितले पाहिजे, नाहीतर रिफंड मिळणार नाही..

शेवटी मी माझ्या मैत्रिणीला अन बाकीच्या मुलींनी आंटीला आवरले.. दोघीही हमरी-तुमरीवरून एकमेकींना मारण्याच्या तयारीत होत्या.. २ वर्षांत जेवढ्या शिव्या, भांडणं(मराठी-तेलेगु मातृभाषेत) पहिली/ऐकली नसतील तेवढी सगळी भर एका भांडणाने भरून काढली होती..
आपण त्यात इंव्होल्व्ह नव्हतो, तरीही सतत वाटत राहिलं.. असं व्हायला नको होतं..
असो. 


जुना पीजी काडूबीसनाहल्ली(माहितीये.. खूप अवघड आहे.. हल्ली म्हणजे गाव.. बँगलोरमध्ये एरीयांची नावे अशीच आहेत..) मध्ये होता, तर नवीन मारथहल्लीमध्ये(मला तर हा अपभ्रंश वाटतो.. मराठाहल्ली असेल पूर्वी, स्पेलिंग पाहून मराठी माणूस असेच वाचेल..)


नवीन पीजी मध्ये जेवण चांगलं आहे.. बँगलोरमध्ये जेवण सोडलं तर दुसरं कशाचाही टेन्शन नाही..
म्हटलं, चला जे झालं ते झालं.. आता आनंदात राहू नवीन ठिकाणी..
पण कसचं काय..!! आमच्या थ्री शेअरिंगच्या रूममध्ये माझ्यानंतर शिफ्ट झालेली मुलगी 'पाहुणे' सोबत घेऊन आली..(बेडबग्स.. अरे देवा.. आयुष्यात कधी पहिले नव्हते..)
आधी २-३ दिवस काही जाणवलं नाही.. नंतर जे झोप उडाली.. ते महिनाभर पीजी ओनर च्या मागे लागून लागून सगळी क्लिनिंग करून घेईपर्यंत..


मध्यंतरी ओनरने त्या मुलीलाही पीजी सोडून जायला सांगितले.. विनाकारण मला अन माझ्या रूममेटला सगळं झेलावं लागलं.. पेनच्या झाकणापासून ते कपाटाच्या कोपऱ्यापर्यंत सर्व स्वच्छ करून घेतलं.. तरी बरं.. जास्त पसरण्यापूर्वीच खबरदारी घेतली ते.. तेव्हापासून आम्ही दर वीकएंडला साफसफाई करतोय रूमची.. उगाचच कशाला रिस्क घ्यायची..!!


तो एक महिना मी आयुष्यभर विसरू शकत नाही.. आमची रूम रात्री आम्हांला अतिशय भयानक जाणवायची.. एखाद्या हॉरर मुव्हीतल्या रुमपेक्षाही भयानक.. पंखा खूप भयानक आवाज करायचा.. भिंतीवर हळू हळू वरच्या दिशेने २-४ चालणारे बग्स दिसायचे.. आम्ही शस्त्र (स्प्रे) घेऊन त्यांना मारायला धडपडायचो.. रोज रात्री कापूर/नेफ्थालीन बॉल बेडच्या चारही साईडना ठेवायचो, अंथरुणावरही फिरवायचो.. त्यातच शेजारचं कुत्रं रात्रभर भुंकायचं .. त्याने आणखी भर.. तो कुत्रा जर मालकाशिवाय, एकटा फिरताना कोणाला सापडला ना.. त्याला कोणी जिवंत सोडतील कि नाही अशीच शंका येते, कारण तो भुंकतोच तेवढा.. मालकही लक्ष देत नाही त्याकडे.. बिचाऱ्याची दयाही येते..


सर्व कपडे, अंथरूण, वस्तू.. सगळं गरम पाण्यात धुवून, रूमचा कोपरान कोपरा स्वच्छ करून.. आठ दिवस सगळं सामान, कपड्यांसह उन्हात वाळवायला लागलं..
अजूनही खबरदारी म्हणून अधून मधून सगळं उन्हात ठेवतो..


आता थोडे चांगले दिवस आलेत.. एक महिन्यात एवढं काही घडून गेलंय कि आम्हांला आता इथे येऊन ६-७ महिने झाल्यासारखं वाटतंय..
पीजी ओनरनेही थोडेफार चेंजेस केलेत.. वाशिंगमशीन आणलंय.. इंवर्टर बसवलाय.. प्रत्येक रूममध्ये टीव्ही आहे.. वाय-फाय आहे.. आणखी काय पाहिजे..!!


पीजी बद्दल ऑफिसमध्ये जेव्हा जेव्हा गॉसिप निघतं.. तेव्हा तेव्हा सगळे विचारतात..'अपार्टमेंट मध्ये का नाही राहत.. आपले पीजी मधलेच ३-४ रुममेट गोळा करून १०-१२ हजारांत एक चांगलं अपार्टमेंट मिळेल..' बरेचसे कलीग्स त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात.. त्यामुळे ते अपार्टमेंट, हाउस प्रेफर करतात..
पण जे जे कलीग्स पीजी मध्ये राहतो.. आमचं एकाच उत्तर असतं, 'आता सवय झाली पीजी मध्ये राहण्याची.. इथे सिक्युअर वाटतं..'


अपार्टमेंट मध्येही सिक्युरिटी असते.. पण पेरेंट्सना कोण समजावणार? त्यांच्यापसून एवढे दूर, त्यांना आपण पीजी मध्ये राहणं जास्त सेफ-सिक्युअर वाटत असेल तर तेच ठीक आहे..
आणि पीजी मध्ये नेहमी नवीन नवीन मैत्रिणी भेटतात.. जर रूममेट्स गावाला, घरी गेल्या तरी सतत कोणीना कोणीतरी असतंच कि पिजीमध्ये..सगळे एकदाच गावाला थोडीच जाणारेत.. मग ते दुसऱ्या रुममध्ये, दुसऱ्या फ्लोअरवर का होईना.. एकटेपणा तेवढाच कमी वाटतो..


माझे कलीग्स कधी कधी असेही चिडवतात, 'जर तुला पगारवाढ झाली.. चांगली ५०% हाईक झाली.. तरीही पीजी मध्येच राहशील??'
माझं एकाच उत्तर असतं,
'अगदी १००% हाईक झाली तरी पीजी मध्येच राहणार..'