आपण दररोज कुठे ना कुठेतरी प्रवास करतच असतो.. मग तो कधी जवळचा असतो, तर कधी लांबचा..
सध्या माझ्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे बंगलोर-नांदेड प्रवास.. खरं तर बंगलोर-नांदेड, मुंबईमार्गे, फ्लाईट असूनही मला नेहमी बस-ट्रेनने जायला आवडतं.. त्यातच तर खरी मज्जा आहे..
मला नेहमी आठवणींत राहणारा प्रवास म्हणजे ऑगस्ट २०११, लास्ट वीकमध्ये मी नांदेडला गेले होते तो..
तेव्हा आईचं एका कानाचं ऑपरेशन होतं.. आणि आई-बाबांनी आणि घरातल्या कोणीही मला सांगितलं नव्हता.. केवळ ह्यासाठी कि मी विनाकारण काळजी करू नये..
पण मला मामाकडून समजलं.. नांदेडमधले कान, नाक, घसा तज्ञ, डॉ. नचिकेत देशमुख हे आम्हांला अगदी घरच्यासारखे आहेत.. मी त्यांना फोन करून कन्फर्म करून घेतलं.. आणि त्यांना आई-बाबांना आणि घरी कोणालाही सांगण्यास मनाई केली.. म्हटलं मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे..
डॉक्टरांना तर सांगितलं.. पण आता पंचाईत होती.. कारण मी तिकीट बुक केलेलं नव्हतं.. माझा नेहमीचा ठरलेला प्रवास म्हणजे, बंगलोर ते हैदराबाद धनुंजयची वोल्वो, जी मारथहल्लीहून रात्री ८ वा. निघते.. आणि सकाळी ६.३०-७ वा. लकडी का पूल ला पोहोचते.. तिथून मग ताबडतोब एखादा ऑटो पकडून काचीगुडा रेल्वेस्टेशन गाठायचं.. ७.३० वा. काचीगुडा-अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस आहे, जी दुपारी १.३०-२ च्या सुमारास नांदेडमध्ये येते.. म्हणजे मी धनुंजयचं २८ ऑगस्टचं आणि ट्रेनचं २९ ऑगस्टचं ताबडतोब तिकीट बुक केलं.. आईचं ऑपरेशन ३० तारखेला होतं..
सगळ्यात कहर म्हणजे धनुंजयची बस कॅन्सल झाली.. त्यांनी मला २७ तारखेला कळवलं..(तरी बरं..!! ऐनवेळी सांगितलं नाही ते..) मग माझी शोधाशोध सुरु झाली.. बरं मला हैदराबादमध्ये सकाळी ७च्या आधी पोहोचणाऱ्या गाड्याच पहायच्या होत्या.. सगळीकडे शोधून शेवटी एक शर्माची बस भेटली.. जी ८वा. निघते आणि सकाळी ५.३०ला लकडी का पूलला पोहोचते.. म्हटलं चला.. भेटली एक गाडी..
पण प्रॉब्लेम्स अजून संपले नव्हते.. नेमकं त्यादिवशी ऑफिसमध्ये डाटाबेसचा डायरेक्टर ऑनसाईटवरून आला अन ६.३०च्या सुमारास त्याने मला अन माझ्या म्यानेजरला मिटिंगसाठी बोलावलं.. मी तर एकदम प्यानिक.. आणि क्रिटीकल रिसोर्स असल्यामुळे ते मला सहजासहजी सोडणार नव्हते.. शेवटी त्यांना माझी परिस्थिती समजावून सांगितली.. माझा ल्यापटोप एका फ्रेशर मुलीजवळ देऊन तिला थोडं काम समजावून सांगितलं..
मग ८वा. प्रवास सुरु झाला.. पण नेमकी गाडी एवढी स्लो होती कि, हेब्बाळपर्यंत पोहोचायला ११.३० वाजले. हेब्बाळ, बंगलोरचा सगळ्यात बाहेरचा एरिया.. तिथून हैदराबाद ८ तास लागतात.. माझं टेन्शन अजून वाढलं.. गाडी जशी हेब्बाळ मध्ये आली, ए.सी. बिघडला.. लोक गोंधळ करायला लागले.. म्हणे एकतर ए.सी. आत्ताच्या आत्ता ठीक करा.. नाहीतर गाडी पुढे जाऊ देणार नाही.. मग काय.. इंटरसिटी गेली माझी.. गाडी हेब्बाळमधून निघाली १.३०ला..मग कसची पोहोचतेय लवकर..९ वाजवले सकाळचे!!
सकाळी सकाळी बंगलोरच्या सगळ्या फ्रेंड्सशी फोनाफोनी झाली.. म्हटलं देवगिरी एक्स्प्रेसचं तिकीट चेक करा.. वाटलं नेमका त्याचवेळेस माझा ल्यापटोप माझ्याजवळ नसावा का..! देवगिरीचं तिकीट भेटलं नाही, कारण रिझर्वेशन चार्ट तयारच झाला होता..
आता कसं करणार?? मग माझी रूममेट, सौम्या हैदराबादची आहे.. ती सुद्धा ट्रेनने निघालेली होती.. तिला फोन केला.. ती सुद्धा सकाळीच पोहोचली होती.. तिच्या बहिणीचं घर कुकटपल्ली मध्ये होतं.. ती म्हणाली, "इकडे ये.. फ्रेश हो.. देवगिरीचं जनरलचं तिकीट काढून तुला बसवून देऊ.."
मग तिच्या घरी गेले.. फ्रेश झाल्यावर तिच्या आईने गरम गरम पेपर डोसे खाऊ घातले.. "ऐसा कोई सौम्या का फ्रेंड आये तो हमको अच्छा मालूम होता.." ती हैदराबादी हिंदीत बोलली..
तिच्याघरापासून सिकंदराबाद पाऊण तासाच्या अंतरावर होतं.. गाडी १.३०ची होती.. ११वा. आम्ही घरातून निघणारच होतो कि.. जबरदस्त पाऊस सुरु झाला..
"आता ट्राफिक खूप वाढलं आहे बाहेर.. आपण १.३०पर्यंत नाही पोहोचू शकणार..", सौम्या म्हणाली.. खरं तर तो तिचाच प्लान होता.. मी तिच्याकडे थांबावं.. एक दिवस राहून मग दुसऱ्या दिवशी नांदेडला जावं..
"आजचा दिवस इथे राहा.. हैदराबादमध्ये फिरुया.. मग उद्या सकाळी इंटरसिटीने जा.. तुझ्यासाठी उद्याचं तिकीट अगोदरच काढलंय आम्ही.. तुला सरप्राईज द्यायचं आहे ना.. मग उद्या ऑपरेशन झाल्या झाल्या दे ना.. आणि असंही तू कधी आली नसतीस.."
मग तीने हैदराबादमध्ये कुठे कुठे फिरवलं.. शोप्पिंग.. खाणं.. ती होती म्हणून मी ही रीलाक्स झाले.. मी नांदेडला जाऊन सांगेपर्यंत आई-बाबांना यातलं काहीच माहिती नव्हतं.. त्यांना फोनवर बोलतानासुद्धा मी बंगलोरमध्येच आहे असं वाटत होतं..
दुसऱ्या दिवशी सकाळी इंटरसिटीत बसले तेव्हा कुठे जीवात जीव आला.. शेवटी नांदेडच्या दिशेने प्रवास सुरु झाला.. २वा. घरी पोहोचले.. आजोबा आणि ईशु घरीच होते.. आईच्या मोबाईलवर फोन केला.. ती नेमकी स्ट्रेचरवर होती.. तरी ऑपरेशन सुरु झालेला नव्हतं.. तिने फोन उचलला आणि काहीच झालेलं नाही.. अशा अविर्भावात बोलत होती.. "आता तरी सांग गं.. मी घरी आलेय.."
तिचा विश्वासच बसत नव्हता.. शेवटी आमच्या कामवालीने फोनवर सांगितले कि 'वर्षाताई आल्यात'.. ईश्वरी सुद्धा बोलली, तेव्हा कुठे तिचा विश्वास बसला..
लगेचच फ्रेश होऊन मी दवाखान्यात गेले.. तिच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं ते.. "आता माझं बाळ आलंय.. मला आता काही भीती नाहीये.." म्हणाली.. ऑपरेशनसुद्धा व्यवस्थित पार पडलं.. तिला त्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला.. मग ८ दिवस तिला आराम करता यावा म्हणून मी आणि बाबांनी ईशुच्या मदतीने घरातली सगळी कामं सांभाळली..
परतीच्या प्रवासात मात्र काही अडचण नाही आली.. दुपारी २.३०ची इंटरसिटी अन रात्री १०.३०ची धनुंजयची बस.. सोपा सरळ प्रवास होता.. पण नांदेडला जातानाचा प्रवास मात्र एक नवीन अनुभव आणि अविस्मरणीय आठवणी मनात ठेवून गेला..
आजही मी धनुंजयने हैदराबादपर्यंत आणि इंटरसिटीने नांदेडला जाते.. आता हैदराबाद म्हणजे अगदी आपल्या एरियात आल्यासारखं वाटतं.. अगदी रात्री बेरात्रीही मी हैदराबादमध्ये एकटी फिरू शकते एवढी हिम्मत माझ्यात आलीये..
नेमकं माझा प्रवास सुरु होण्याआधी एकदोघांनी मला म्हटलं होतं.. 'धनुंजयची बस नाहीये म्हणजे तू ट्रेन मिस करणार हे नक्की.. कुठलीही बस वेळेवर पोहोचत नाही..'
पण आता या प्रवासाची सवय झालीये.. आणि मी तो एन्जोयही करते.. नेहमीचा कंटाळवाणा प्रवास काय कोणीही करतात.. शेवटी कधी कधी बस/ट्रेन मिस करणे, अगदी धावत धावत गाडी पकडणे.. यातच तर प्रवासाची खरी मजा आहे..!!
Thrilling experience. Great. It reminded me of my experience in 1995. http://railandbusfanning-ram.blogspot.in/2012/05/blog-post.html
ReplyDeleteमस्तच होता अनुभव.
ReplyDeleteगेल्या १५ ऑगस्टला मीसुद्धा माझ्या आईला तिच्या वाढदिवसाचे असेच एक सरप्राईज दिले. (योगायोग म्हणजे मीसुद्धा हैदराबादहून नांदेडलाच आलो होतो.)
आपल्या आई-वडिलांच्या चेहर्यावर असे हास्य पाहिले की वाटतं बस्स.... आता जगात दुसरे काहीही पाहिले नाही तरी चालेल.