आज वीकेंडचं कुठेच भटकायला गेले नाही म्हणून रुममध्ये बसून बोअर होत होतं.. शेवटी बाजूच्या रुममध्ये राहणारी माझी मैत्रीण गिटार क्लासला निघाली तेव्हा तिच्यासोबत गेले.. म्हटलं, मी ऐकेन बाहेर बसून किंवा मग वरच्या सीसीडीत जाऊन बसेन.. आमच्या पीजीच्या जवळच मारथहल्लीमध्ये आहे तो क्लास, 'द साऊन्ड्स ऑफ म्युझिक'..
मैत्रीण गेली आत गिटारच्या टीचरकडे.. बाहेर वेटिंगरूम सारखीच सोय केलेली होती, तिथे शिकायला येणाऱ्या लहान मुलांच्या पेरेंट्सना बसण्यासाठी म्हणून.. तिथेच जाऊन बसले.. तिथे कला क्लासेस, गिटार तसेच व्होकलचेही क्लासेस घेतले जातात, असं तिथल्या को-ओर्डीनेटरशी बोलताना कळले..
जिथे बसले होते त्याच्या मागच्या रूममधून संगीताचे सूर ऐकू येत होते.. सगळीच लहान मुले आणि एक टीचर गात होते.. त्यांना गायनाचा सराव करताना ऐकून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले.. माझे गुरु 'श्री कांजाळकर' यांची आठवण आली.. त्यांच्याकडे मी संगीत शिकायला जायचे.. हार्मोनियम शिकले आणि तबल्याचा सराव सुरु करणारच होते, पण बाबांची बदली झाली आणि मी परभणीला गेले.. त्यानंतर शिक्षणामुळे मी गायनाकडे पाठ फिरवली आणि आज आयटी क्षेत्रात आलेय.. या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या..
थोड्या वेळाने गायनाचा क्लास सुटला आणि सगळी छोटी छोटी मुलं त्यांच्या पेरेंट्सबरोबर बाहेर पडली.. मग पाठोपाठ त्यांची टीचरही आली.. रीना बासू.. वयस्कर असल्या तरी त्या वागण्या-बोलण्यात अतिशय चपळ.. नेमका आज त्यांना थोडा मोकळा वेळ भेटला म्हणून त्या येऊन बसल्या वेटिंगरूममध्ये.. त्यांच्याकडे गेले.. त्यांनी नाव विचारल्यावर म्हटलं, 'वर्षा' तर त्या आधी 'बरखा' म्हणाल्या, मग 'बर्षा' म्हणाल्या.. दोन-तीन वेळेस ट्राय केल्यावर कुठे 'वर्षा' म्हणाल्या.. मग थोडीफार चौकशी करून झाल्यावर आम्ही गायनावर आलो.. मी त्यांना म्हटलं, कि मला लहानपणी खूप आवड होती.. गायनावर डिस्कस करताना त्यांनी थोडीशी गाणी एकून दाखवली आणि मग मला कुठलंही एखादं माझ्या आवडीचं गाणं म्हणायला सांगितलं.. नेमकं त्या वेळेस मला कुठलंच आठवलं नाही.. शेवटी 'जय शारदे, वागेश्वरी' हे गाणं म्हणून दाखवलं.. त्यांनी त्यात राग, सूर, ताल, लय.. सगळ्यात इतक्या चुका काढल्या कि आम्ही खूप हसलो त्यावर..
त्यांनी खूप छान समजावून सांगितलं.. त्यांना मॉडेल बनण्याची इच्छा होती, पण त्या गायिका झाल्या.. आणि आता या वयात त्यांना ते शक्यही नाही.. मलासुद्धा म्हणाल्या, 'गायनासाठी संपूर्ण डेडिकेशन लागतं आणि खूप सराव करावा लागतो, जसं तुमच्या कामासाठी तुम्हाला धडपडावं लागतं, तसंच..' खूप बोलल्या काय व्हायचं होतं आणि काय झाल्या याबद्दल..
त्या पुन्हा पुढचा क्लास घ्यायला गेल्यावर मी परत आजुबाजुल्या बसलेल्या पेरेंट्सशी गप्पा मारायला लागले.. बोलता बोलता कळलं, कि रीना म्याडम एक खूप मोठ्या गायिका आहेत आणि बंगलोरमध्ये त्यांचं खूप नाव आहे.. त्यांचा एक क्लासिकल म्युझिक अल्बम सुद्धा येतोय जो सुधा मूर्ती(इन्फोसिसच्या फाऊण्डर)यांच्या पुढाकाराने लवकरच बाजारात येईल.. तेव्हा वाटलं, अरे एवढी मोठी व्यक्ती आपल्याशी एवढा वेळ बोलली.. त्यांनाही आयुष्यात जे व्हायचं होतं, ते त्या होऊ शकल्या नाहीत.. पण आज त्या ज्या क्षेत्रात आहेत त्यात अगदी समरसतेने आणि तेवढ्याच उत्साहाने काम करतात.. खूप कमी लोक असतात, ज्यांना आपल्या मनासारखं काम करायला मिळतं.. पण मग म्हणून रडत न बसता आपणही आहोत त्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतो.. रीना बासुंसोबतची छोटीशी भेट मला हेच शिकवून गेली..!!!
ashych vykti jeevan yetat kahi tari shikvun jatat he khare ahe.
ReplyDeleteNow you can practice for singing.