Saturday, August 20, 2011

ऋतू

मला जर कोणी विचारले कि माझा आवडता ऋतू कोणता, तर माझे नेहमीचे उत्तर म्हणजे ग्रीष्म आणि शरद.
हे दोन्ही ऋतू मला तितकेच आवडतात.
आपल्या भारतीय, वेदिक कॅलेंडरप्रमाणे ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा, ज्येष्ठ-आषाढ महिन्याचा काळ(जून-जुलै) आणि शरद ऋतू म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीचा, अश्विन-कार्तिक महिन्याचा काळ(ऑक्टोबर-नोव्हेंबर).
ऋतू म्हटले कि महाकवी कालिदासाची 'ऋतुसंहार' रचना आठवते. प्रत्येक ऋतूबद्दल अतिशय सुंदर लिहिलेय तिच्यात..!!
मराठीत ऋतूसंहार म्हणजे ऋतूंची माळ असे म्हणू शकतो.(ऋतू आणि संहार अशी जर संधी करत असाल, तर तुम्ही चुकता आहात; इथे ऋतुसंहार हा एकाच शब्द आहे, ऋतूचा संहार(नाश, पाडाव, विनाश..) नाहीये.!)
खरेच.., एकामागून एक माळेसारखे ऋतू बदलत जातात.
ऋतूबद्दल आणखी एक मराठी गीत प्रसिद्ध आहे, आशा भोसलेंनी गायलेले, श्रीधर फडके यांनी कंपोज केलेले 'ऋतू हिरवा, ऋतू बरवा..' (आणखीही दुसरी गीते आहेत, पण मला आता सध्या हेच गाणं आठवतंय..)
इतक्या चांगल्या गाण्याचे व्हीनस कंपनीने वाटोळे केलेय.. अतिशय टुकार अन भिकार चित्रफित (video) तयार केलेली आहे. (यातले नट अन नटी तर त्याहूनही भंकस.. लोल..!!)
असो, आपण ऋतूबद्दल बोलतोय..
ग्रीष्म ऋतू म्हणजे आपला उन्हाळा. एक गरम वातावरण सोडले तर काय मजा असते नाही उन्हाळ्यात..!! शाळा, कॉलेजेसना सुट्ट्या असतात, जॉब करणारेही लाँग हॉलीडेवर जातात. मग मामा, मावश्या, आज्जी-आजोबा.. सगळीकडे थोडे थोडे दिवस राहून चंगळ होते.. मग सर्व मिळून दुपारच्या वेळी एखाद्या जवळच्या ठिकाणी पिकनिकला जाणे, घरून जरी खाण्यापिण्याचे सामान घेऊन गेलो तरी जवळच्या शेतात जाऊन ऊस, कैऱ्या,.., तोडून आणणे.. हे चालतंच. अगदी घरात जरी असलो तरी, जेवणाच्या वेळी सर्व एकत्र बसून जेवण्यातही मजा येते. मग त्यातही जर आमरसाचे जेवण आणि टीव्हीवर आवडीचा सिनेमा, प्रोग्रॅम असेल तो क्या बात है..!
मग गप्पांचा फड जमतो किंवा बाहेर ऊन असतं म्हणून घरातच पत्ते, कॅरम,.. असे काहीतरी चालू होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबे याच सिझनमध्ये मिळतात. आंब्याला फळांचा राजा काही उगाच म्हणत नाहीत.. कैरी, आंब्यापासून कितीतरी पदार्थ तयार होतात.., कांदा-कैरी चटणी, आमरस, साखरआंबा, तक्कू, पन्हं, इ.इ..
उन्हाळ्यातली रात्र म्हणजे अतिशय थंडगार. दिवसभर गरम असलेले वातावरण अगदी थंड होऊन जाते. मग चांदण्या रात्री गच्चीवर आज्जी-आजोबांच्या गोष्टी ऐकण्यात रात्र कशी निघून जाते ते कळतच नाही.
वट पौर्णिमा, गुरु पौर्णिमा, आषाढी एकादशी,.. हे सगळे सण-वार ग्रीष्मातले.
शाळेत असतानाची एक कविता आठवते, 'ग्रीष्मातल्या सकाळी, आले भरून मेघ.. अन विस्कटून गेले, सारे प्रभात रंग.. पाहून मम उदासी, चाफा हसून बोले, सद्भाग्य केवेढे हे, आले भरून मेघ..'
अशा या गरम वातावरणात पावसाची एक हलकीशी सरही मनाला थंडावा देऊन जाते.
माझा दुसरा आवडता ऋतू म्हणजे शरद. इंग्लिशमध्ये याला ऑटम (autumn) म्हणतात. हा हिवाळा सुरु होण्या आधीचा काळ. या दिवसांमध्ये, पावसाळा नुकताच संपलेला असल्याने वातावरण अतिशय आल्हाददायक, उत्साहपूर्ण असतं. नवरात्र, दसरा, दिवाळी, कर्तिक पौर्णिमा,.. हे उत्सव शरदातले.
'शरदाचे चांदणे' नावाची दूरदर्शनवरची सीरिअल आठवते. शरद हाडप यांचा कथासंग्रहहि 'शरदाचे चांदणे' याच नावाने आहे.
शरद ऋतूला पानझड, पानगळ याही नावाने ओळखले जाते. या दिवसात जवळपास सर्वच झाडांची पानगळ होते, झाडांच्या नुसत्या फांद्या, बुंधे शिल्लक राहतात आणि खाली वाळलेल्या पानांचा सडा पडलेला दिसतो.
अशावेळेस वातावरणात वेगळीच रंगसंगती दिसून येते. पावसाळ्यात तरी केवळ हिरवळ दिसते. पण पानगळीच्या दिवसात, सगळेच रंग दिसतात, हिरवे गवत, त्यावर पडलेली विविध रंगांची वळलेली पानं.. सगळ्यात रंगीबेरंगी ऋतू आहे हा.
वाळलेल्या पानांवरून मुद्दाम चालत जाताना त्यांचा 'चर्रर्र.. चर्रर्र..' आवाज ऐकायला कोणाला नाही आवडत..!!
अशावेळेस कुठल्यातरी गूढ आठवणी ताज्या होतात. (प्रत्येक गूढ, रहस्यमयी,.. चित्रपटात, कादंबरीत, गोष्टीत याचा कुठेना कुठेतरी संदर्भ येतोच.. म्हणून असेल कदाचित..)
या ऋतूत झाडांवरची जुनी, खराब झालेली, वळलेली पाने गळून पडतात, कारण त्याजागी नवीन येणार असतात.
शारदातली हि पानगळ म्हणजे आजपर्यंतच्या ज्या काही खराब, वाईट गोष्टी घडल्या, त्यांना पायदळी तुडवून उद्या जे घडेल, ते नवीन, चांगलेच असेल आणि झाडे जशी त्यांच्यावर फुटणाऱ्या नवीन पालवीच्या स्वागताला सज्ज होतात, तसेच आपणही आपल्या चांगल्या भवितव्यासाठी उत्साहाने सज्ज व्हायला हवे, हेच तर सुचवत नसेल?
उद्या तुम्ही, मी आपण, या जगाच्या पसाऱ्यात कुठेही असू शकतो, पण हा 'ऋतुसंहार' मात्र जिथल्या तिथेच असणार आहे.. अगदी अगणित काळापासून अगणित काळापर्यंत..!!

No comments:

Post a Comment