Monday, September 26, 2011

आज्जीचं घर


आजही मला ते घर आठवतं. खरं तर ते माझ्या आज्जी-आजोबांचं, म्हणजे माझ्या आईचे आई-वडील, यांचं घर.. पण मी आज्जीचंच घर म्हणते..
नांदेड हौसिंग सोसायटी मध्ये, नागसेन नगर जवळ, 'समर्थ निवास, १९७३' लिहिलेलं ते घर अजूनही तेवढ्याच दिमाखात उभं आहे..
तीन महिन्यांची होते तेव्हापासून ते दहा वर्षांची होईपर्यंत आणि आम्हा १६ मामे-मावस भाऊ-बहिणींमध्येही सर्वात जास्त मी काळ त्या घरात आज्जी-अण्णा सोबत राहिलेय..माझे सगळे वाढदिवस तिथेच साजरे केलेय..
आमचं घरही त्याच्या मागच्याच गल्लीत, परळकरच्या वाड्यात होतं..
अण्णा मला नेहमी आठवणी काढून सांगतात, लहान होते तेव्हा माझ्यासाठी घरात पाळणा बांधला होता, अण्णा मला दिवसभर झोका द्यायचे..
माझ्यासाठी बनवलेली छोटी गादी अजूनही घरात वरच्या मजल्यावर पडून आहे..
घरात खाली तीन आणि वर दोन अशा पाच खोल्या आहेत आणि बाहेर खूप मोठे अंगण जिथे जवळपास सगळीच फुलझाडं अन पेरूचे, बोरीचे झाड आहे.
अण्णांना झाडांना, फुलांना हात लावलेलं अजिबात चालायचं नाही.. घराचे गेट, ज्याला फाटक म्हणायचे, तेही उघडं ठेवलेलं चालायचं नाही आणि आम्ही पोरं दरवेळी हे विसरायचो.. मग अण्णा ज्याच्यावर रागावतील त्याला चिडवायचो..
घराच्या बाजूनेच नागसेन नगर चालू होतं.. तिथली उनाड पोरं यायची, पेरू, आंबे, बोरं पडायला.. ती अण्णांना चिडवायची, त्यांचे नाव 'तुकारामपंत पाठक' असूनही 'अण्णा पाठक' म्हणायची.. त्यातलंही पाठक चुकीचं.. 'फाटक' म्हणायची.. 
त्या जुन्या घरात दर पावसाळ्यात बाहेर मोठे मोठे गांडूळ, मुंगळे निघायचे.. अंगणात फरशीवर, पायरीवर.. कुठे कुठे.. आम्हाला किळस यायची.. 
घरात अण्णा रोज दुपारपर्यंत देवपूजा करायचे.. आणि आज्जी स्वयंपाक..
मी लहानपणी जेवणाच्या बाबतीत आईला खूप त्रास दिलेला आहे.. हे नको, ते नको.. पण जेव्हा जेव्हा शाळेतून घरी येईन तेव्हा आजीच्या हातचं गरम गरम वरण-भात अन त्यावर साजूक तूप मात्र आवडायचं..
आज्जीचं माहेर म्हणजे आदिलाबाद.. मुळचे मराठीच पण तिकडे स्थाईक झालेले(आता तुम्हाला कळले असेल, चेहऱ्यावरून मी साउथ इंडिअन का वाटते ते..) त्यामुळे तिला वरण, भाजी, सार अतिशय चांगलं जमायचं.. 
रोज दुपारी माडीवर खेळायला जायचे तेव्हा तिथे आज्जीचं छोटंसं कपाट होतं.. त्यातनं ती खडीसाखर काढून द्यायची..तिची अन माझी खूप गट्टी जमायची.. मुळात तिची अन माझी रास एकच, मकर..
आज्जी गेल्यानंतरही अण्णा जेव्हा खडीसाखर द्यायचे, तेव्हा तिची खूप आठवण यायची..
आजही कितीही मोठे झालो तरी जेव्हा अण्णांकडे जाईन तेव्हा त्यांना निरोप देताना हातावर खडीसाखर पडतेच..
घरातला टीव्ही म्हणजे सर्वात जास्त तापदायक.. दररोज गच्चीवर जाऊन अन्टेना फिरवावे लागायचे.. तेव्हा रिमोटहि नव्हता.. रेडीओला जसं बंद-चालू, आवाज कमी जास्त करण्याचं बटन असतं तसंच त्या टीव्हीला होतं.. जे चित्र व्यवस्थित दिसावं म्हणून फिरवायचो.. आता अन्टेना पूर्णपणे निकामी झालाय, केबल आले तरीही टीव्हीचा तोच प्रॉब्लेम चालू असतो.. चित्र व्यवस्थित नाही..
१९९४ साली आज्जी गर्भाशयाच्या कॅन्सरने गेली तेव्हापासून घर अगदी सुनं सुनं वाटायला लागलं.. अण्णाही आधी घरात एकटेच राहायचे..
नंतर अण्णांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी मामाने अण्णांना आपल्याकडे ठेऊन घेतलेय.. तेव्हापासून ते तिकडेच असतात..
आताही अधून मधून कधी काम पडले तर जुन्या घरी एखादी चक्कर चालू असते.. तेव्हा देवघर, स्वयंपाकघर, माडी.. सगळं बघून जुन्या आठवणी ताज्या होतात.. 
आता अंगण थोडंसं कमी झालंय.. रस्ता रुंदीकरणासाठी घराच्या बाजूचं अंगण कमी झालंय.. रस्ता तर काही रुंद झालाच नाही.. पण आता त्या मोकळ्या जागेत समोरचे कांबळे मामा त्यांच्या म्हशींना आणून बांधतात..
आज्जीच्या हातची चव मात्र मी अजून विसरू शकले नाही.. मुळात तसं वरणच मी नंतर खाल्लेलं नाही..
एकदा मला आईच्या हातचं वरण अजिबात नाही आवडलं, तेव्हा मी तिला म्हणाले होते, 'तुला आज्जीकडून तिच्यासारखं वरणसुद्धा शिकता आलं नाही.. बहुतेक मला आता तिच्यासारखं वरण तिच्याकडेच वर जाऊन खायला भेटेल..' त्यावेळेस समजलंहि नव्हतं कि मी असं काय बोलले अन आई माझ्यासाठी एवढी का रडली ते..
आज आज्जी-अण्णांचा आशीर्वाद आहे म्हणूनच त्यांची सर्व मुलं, नात-नातू सगळे आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करताहेत..
भूतकाळातल्या त्या आठवणींचा ठेवा, ते आज्जी-अण्णांचं जुनं घर आजही तसंच आहे.. त्यानं पाहिलेल्या, झेललेल्या कडू-गोड आठवणींची साक्ष देत..

Sunday, September 11, 2011

माझी भावंडं


प्रत्येकाला एकतरी भाऊ-बहिण असतेच. सख्खे नसले तरी मावस, चुलत, मामे, आते,.. असतातच.
भावंडांच्या बाबतीत मी अगदी श्रीमंत आहे म्हटले तरी चालेल, माझ्या आईच्या माहेरचे, मावस, मामे असे मिळून आम्ही १६ भावंड आहोत.
हे सगळेच्या सगळे भायलोग म्हणजे बडे काम कि चीज असतात. अगदी रिचार्ज मारण्यासारख्या छोट्यातल्या छोट्या कामापासून ते जॉबसाठी रेझ्युम फोरवर्ड करण्यासारखे सगळे काम त्यांच्याकडून करून घेतले जाऊ शकतात.(कोणी दादा, ताई जर हे वाचत असेल, तर गुस्ताखी माफ..)
आमची मामे-मावस भावंडांची क्रमवारी मलाच आठवायला अवघड जाते: वैभवदा, मनोजदा(मनुदादा), मनीषाताई(माईताई), विनोददादा(मुन्नादादा), पवनदादा, मकरंददादा(टिंकूदादा), सतेजदादा, वर्षा(मी), मंगेश, श्रीकांत, श्रद्धा, सायली, सागर, रोहित, ईश्वरी, आदित्य.. हि उतरत्या क्रमाने नावे.
यात मी मधली आहे. तुमच्या भावंडांत तुम्ही जर मधले असाल, तर तुमची काही खैर नाही..!!
दोन्हीकडून तुमचाच पोपट होणार, हे निश्चित.. चिल्ल्या-पिल्ल्यांसोबत असले तर मोठी माणसं म्हणतात, "तू त्यांच्यांत मोठी आहेस.. तुला कळायला पाहिजे काय बरोबर आहे अन काय चूक आहे ते.."
आणि मोठ्यांसोबत असल्यावर, "ए.. तू गप्प बस.. तू अजून लहान आहेस.. तुला काय कळतंय यातलं?.." चालू असतं.
मग काय करणार बिचारी.. जाएं तो जाएं कहाँ..!!
एकतर छोट्यांना वाटते, कि वर्षूदीदी त्यांची आहे.. तिने त्यांच्यासोबत बुद्धिबळ, पत्ते, कॅरम,.. खेळायला पाहिजे.. आणि दुसरीकडे मोठ्यांची मैफिल जमलेली असते, तिकडे त्यांना वाटते, वर्षूला आता आपल्यात घ्यायला हरकत नाही..
श्रीकांत, श्रद्धा, मंगेश, सायली, सागर, रोहित, ईश्वरी अन आदित्य तसे छोट्या गटात येतात.(त्यापैकी काहीजण हायस्कूल-कॉलेजमध्ये शिकतात तरीही..) त्यांना मी त्यांच्यातलीच वाटते, म्हणून त्यांचे सारे सिक्रेट्स मला माहित आहेत.. आणि मोठ्यांच्या बाबतीतही बऱ्याचशा गोष्टी आता माहित होताहेत.(हा एक फायदा आहे मधले होण्याचा..)
छोट्यांशी खेळताना आपणही केव्हा त्यांच्यातलेच एक होऊन जातो हे कळत नाही.
पण एक गोष्ट मात्र खरी, सगळ्यांमधले नाते तेवढे पारदर्शक असायला हवे. राग-लोभ, रुसवा-फुगवा, थट्टा-मस्करी तर चालतच असतं.. हे तेवढ्यापुरते तेवढे असायला हवे, नाहीतर आपण अन त्यांच्यातलं समीकरण बिघडतं.
माझ्यासाठी माझ्या बाजूने उभी राहणारी माझी फौज म्हणजे हेच सर्व, जे गरज पडेल तेव्हा, जर वेळ आलीच तर, अगदी आई-बाबा, मावशा, काका, मामा,.. सगळ्यांच्या विरुद्ध होऊन माझी साथ देतील.
त्यासाठी मी हि अगदी चिल्लर पार्टीला सुद्धा मस्का मारत असते.(चिल्लर पार्टी म्हणजे छोट्या गटातले..)
जेव्हा जेव्हा आमची सर्वांची भेट होईल, तेव्हा एकदातरी माझी चिल्लर पार्टीसोबत सिक्रेट मीटिंग असते.(सिक्रेट मीटिंग म्हणजे मग ती गोदावरी, गोकुल, सिटीप्राईड,.. कुठेही जेवायला जाणार, पण तेव्हा फक्त आणि फक्त मी आणि चिल्लर पार्टी.. मोठे कोणीही नसणार..) मोठ्यांना मात्र सगळ्यांसोबत कॉमन डिनरला घेऊन जाते.(तसेही मोठ्यांमध्ये जवळपास सगळ्यांची लग्नं झालीयेत.. तुम्ही समजू शकता.. ते तेवढे काही कामाचे नाहीत.. आय मीन त्यांच्याजवळ तेवढा वेळ नसतो..)
मोठे यासाठीच आम्हाला रेल्वेचे डबे म्हणून चिडवतात. असो.
दरवर्षी एकदातरी आमचं रक्षाबंधन/भाऊबीजसाठी गेट-टुगेदर होत असतं, त्यावेळेस सगळे मामाकडे किंवा मावशीकडे जमतो, तेव्हा मात्र मोठे-लहान हा फरक राहत नाही.
आमच्याकडे अगदी मामा लोकांपासून प्रत्येकजण केवळ आयटी/सोफ्टवेअर क्षेत्रातच आहे, कोणीही डॉक्टर नाहीये, चिल्लर पार्टीही गणितामध्येच अग्रेसर आहे..
या बाबतीत सगळ्यांमध्ये एकी आहे.
शेवटी, सगळ्यांनी यशस्वी व्हावे, आणि महत्त्वाचे म्हणजे कितीही दूर गेलो तरीही दरवर्षी एकदातरी भेटण्याची आपली परंपरा अशीच चालू राहावी अशीच मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते.