Monday, September 26, 2011

आज्जीचं घर


आजही मला ते घर आठवतं. खरं तर ते माझ्या आज्जी-आजोबांचं, म्हणजे माझ्या आईचे आई-वडील, यांचं घर.. पण मी आज्जीचंच घर म्हणते..
नांदेड हौसिंग सोसायटी मध्ये, नागसेन नगर जवळ, 'समर्थ निवास, १९७३' लिहिलेलं ते घर अजूनही तेवढ्याच दिमाखात उभं आहे..
तीन महिन्यांची होते तेव्हापासून ते दहा वर्षांची होईपर्यंत आणि आम्हा १६ मामे-मावस भाऊ-बहिणींमध्येही सर्वात जास्त मी काळ त्या घरात आज्जी-अण्णा सोबत राहिलेय..माझे सगळे वाढदिवस तिथेच साजरे केलेय..
आमचं घरही त्याच्या मागच्याच गल्लीत, परळकरच्या वाड्यात होतं..
अण्णा मला नेहमी आठवणी काढून सांगतात, लहान होते तेव्हा माझ्यासाठी घरात पाळणा बांधला होता, अण्णा मला दिवसभर झोका द्यायचे..
माझ्यासाठी बनवलेली छोटी गादी अजूनही घरात वरच्या मजल्यावर पडून आहे..
घरात खाली तीन आणि वर दोन अशा पाच खोल्या आहेत आणि बाहेर खूप मोठे अंगण जिथे जवळपास सगळीच फुलझाडं अन पेरूचे, बोरीचे झाड आहे.
अण्णांना झाडांना, फुलांना हात लावलेलं अजिबात चालायचं नाही.. घराचे गेट, ज्याला फाटक म्हणायचे, तेही उघडं ठेवलेलं चालायचं नाही आणि आम्ही पोरं दरवेळी हे विसरायचो.. मग अण्णा ज्याच्यावर रागावतील त्याला चिडवायचो..
घराच्या बाजूनेच नागसेन नगर चालू होतं.. तिथली उनाड पोरं यायची, पेरू, आंबे, बोरं पडायला.. ती अण्णांना चिडवायची, त्यांचे नाव 'तुकारामपंत पाठक' असूनही 'अण्णा पाठक' म्हणायची.. त्यातलंही पाठक चुकीचं.. 'फाटक' म्हणायची.. 
त्या जुन्या घरात दर पावसाळ्यात बाहेर मोठे मोठे गांडूळ, मुंगळे निघायचे.. अंगणात फरशीवर, पायरीवर.. कुठे कुठे.. आम्हाला किळस यायची.. 
घरात अण्णा रोज दुपारपर्यंत देवपूजा करायचे.. आणि आज्जी स्वयंपाक..
मी लहानपणी जेवणाच्या बाबतीत आईला खूप त्रास दिलेला आहे.. हे नको, ते नको.. पण जेव्हा जेव्हा शाळेतून घरी येईन तेव्हा आजीच्या हातचं गरम गरम वरण-भात अन त्यावर साजूक तूप मात्र आवडायचं..
आज्जीचं माहेर म्हणजे आदिलाबाद.. मुळचे मराठीच पण तिकडे स्थाईक झालेले(आता तुम्हाला कळले असेल, चेहऱ्यावरून मी साउथ इंडिअन का वाटते ते..) त्यामुळे तिला वरण, भाजी, सार अतिशय चांगलं जमायचं.. 
रोज दुपारी माडीवर खेळायला जायचे तेव्हा तिथे आज्जीचं छोटंसं कपाट होतं.. त्यातनं ती खडीसाखर काढून द्यायची..तिची अन माझी खूप गट्टी जमायची.. मुळात तिची अन माझी रास एकच, मकर..
आज्जी गेल्यानंतरही अण्णा जेव्हा खडीसाखर द्यायचे, तेव्हा तिची खूप आठवण यायची..
आजही कितीही मोठे झालो तरी जेव्हा अण्णांकडे जाईन तेव्हा त्यांना निरोप देताना हातावर खडीसाखर पडतेच..
घरातला टीव्ही म्हणजे सर्वात जास्त तापदायक.. दररोज गच्चीवर जाऊन अन्टेना फिरवावे लागायचे.. तेव्हा रिमोटहि नव्हता.. रेडीओला जसं बंद-चालू, आवाज कमी जास्त करण्याचं बटन असतं तसंच त्या टीव्हीला होतं.. जे चित्र व्यवस्थित दिसावं म्हणून फिरवायचो.. आता अन्टेना पूर्णपणे निकामी झालाय, केबल आले तरीही टीव्हीचा तोच प्रॉब्लेम चालू असतो.. चित्र व्यवस्थित नाही..
१९९४ साली आज्जी गर्भाशयाच्या कॅन्सरने गेली तेव्हापासून घर अगदी सुनं सुनं वाटायला लागलं.. अण्णाही आधी घरात एकटेच राहायचे..
नंतर अण्णांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी मामाने अण्णांना आपल्याकडे ठेऊन घेतलेय.. तेव्हापासून ते तिकडेच असतात..
आताही अधून मधून कधी काम पडले तर जुन्या घरी एखादी चक्कर चालू असते.. तेव्हा देवघर, स्वयंपाकघर, माडी.. सगळं बघून जुन्या आठवणी ताज्या होतात.. 
आता अंगण थोडंसं कमी झालंय.. रस्ता रुंदीकरणासाठी घराच्या बाजूचं अंगण कमी झालंय.. रस्ता तर काही रुंद झालाच नाही.. पण आता त्या मोकळ्या जागेत समोरचे कांबळे मामा त्यांच्या म्हशींना आणून बांधतात..
आज्जीच्या हातची चव मात्र मी अजून विसरू शकले नाही.. मुळात तसं वरणच मी नंतर खाल्लेलं नाही..
एकदा मला आईच्या हातचं वरण अजिबात नाही आवडलं, तेव्हा मी तिला म्हणाले होते, 'तुला आज्जीकडून तिच्यासारखं वरणसुद्धा शिकता आलं नाही.. बहुतेक मला आता तिच्यासारखं वरण तिच्याकडेच वर जाऊन खायला भेटेल..' त्यावेळेस समजलंहि नव्हतं कि मी असं काय बोलले अन आई माझ्यासाठी एवढी का रडली ते..
आज आज्जी-अण्णांचा आशीर्वाद आहे म्हणूनच त्यांची सर्व मुलं, नात-नातू सगळे आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करताहेत..
भूतकाळातल्या त्या आठवणींचा ठेवा, ते आज्जी-अण्णांचं जुनं घर आजही तसंच आहे.. त्यानं पाहिलेल्या, झेललेल्या कडू-गोड आठवणींची साक्ष देत..

1 comment: