नवरात्र सुरु होण्यापूर्वीचा रविवारचा दिवस. खूप दिवसांनी घरात सर्वजण आज्जी-आजोबांकडे गेट-टुगेदर साठी जमलेले.
दुपारी जेवण झाल्यावर घरातले मोठे लोक, म्हणजे बाबा-काका-आजोबा.. आरामात गप्पा मारत पडलेले..
घरातले यंग जनरेशन मात्र बाहेर.. मुलं क्रिकेट खेळण्यात तर मुली शॉपिंगमध्ये दंग.
काहीतरी बोलण्याचा विषय काढायचा म्हणून घरात असलेल्या सदस्यांपैकी एकाने सुरु केले.."या वेळेस नवरात्र थोडी वेगळ्या पद्धतीने साजरी करूया का??"
दुसरा : वेगळ्या म्हणजे कशा? दरवर्षी आपण असंच म्हणतो..पण नेहमी आपला प्लान फ्लॉप होतो..
पहिला : आपण काहीतरी ठरवूया ना सगळे मिळून.. म्हणजे नेहमीपेक्षा थोडंतरी काही नवीन असायला हवं..
एव्हाना घरातल्या बायका, आई, आज्जी, काकू सगळ्या स्वयंपाकघरातली कामं आटपून हॉलमध्ये त्यांच्या गप्पांत सामील झाल्या होत्या..
एक-एक जण नवीन शक्कल लढवत होता, कि नवीन काय करायचं नवरात्रीला..
मग एक काका म्हणाले, "आता कॉलनीत जी सार्वजनिक देवी बसते.. ती तर काही आपल्या घरात बसवणं शक्य नाही.. पण वाटलं तर सगळा खर्च आपण देऊ शकतो.."
त्यावर दुसरं कोणीतरी म्हणालं, "नाही.. नको.. सार्वजनिक देवी हि संपूर्ण कॉलनीसाठी आहे.. आपल्याला जे काही करायचे आहे ते आपल्यासाठी आणि शक्यतो घरातच.."
सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला..
घरातलाच दहा वर्षांचा एक छोटा सदस्य हॉलमध्ये येत म्हणाला, "आपण सगळ्यांनी मिळून नवरात्रीत नऊ दिवस चप्पल सोडली तर..??" (त्याची काय चूक म्हणा.. तो हि आपल्या परीने सुचवू पाहत होता..)
आज्जी म्हणाली, "बाळा, तुला इथलं किराणा दुकान माहित आहे ना.. स्वयंपाकघरातल्या ओट्यावरची चिठ्ठी घेऊन थोडं समान आणशील?.. तुला खीर आवडते ना?.. आज संध्याकाळी करून देईन.."
तो हि खुश होऊन, "हो आज्जी.." म्हणत पळाला..
त्याला बाहेर पाठवल्यावर पुन्हा मोठे चर्चा करू लागले..
त्यातल्या एकाने सुचवलं, "आपण नवरात्रीत तुळजापूरला गेलो तर?? कुलदेवतेचं दर्शनही होईल अन नवरात्रही चांगली साजरी होईल.."
एक काकू बोलली, "नाही.. नको.. दहा दिवस तुळजापूरमध्ये राहणं शक्य नाही.. पोरांच्या शाळा-कॉलेजना सुट्ट्या नाही मिळणार एवढ्या.."
"हो बरोबर आहे.. आपल्यालाही ऑफिसमधनं दहा दिवस सुट्टी मिळणं कठीणच आहे..", आणखी एकजण म्हणाला..
"ओके.. मग घरातच ठीक आहे.. आपण रोज एकशे अकरा आरत्या म्हणूयात का? मोठी पूजा ठेऊन.."
"एकशे अकरा?? एकशे एकवीस म्हणायचं होतं ना.. अरे काय भाऊ..!! कितीही मोठं आरती संग्रहाचं पुस्तक आणलं तरी एवढ्या आरत्या त्यात सापडणार नाहीत.. मुळात सगळ्या भाषेतल्या देवीच्या सगळ्या आरत्या मिळूनही एकशे अकरा होणार नाहीत.. आता सगळ्या भाषेतल्या आरत्या वाचता येत नाहीत..तो भाग वेगळा.."
"ओके ओके.. आरत्या कॅन्सल.. दुसरा काहीतरी विचार करू.."
"अरे, आपल्याकडे दसऱ्याला मोठी आरती असते ना.. तेव्हा जोगवा मागतात.. तसा रोज मोठी आरती अन जोगवा.."
"घरातल्या घरात कुठे जोगवा असतो का? काहीपण ना राव!! आता म्हणू नका कि शेजारच्यांकडे जाऊन जोगवा मागुया म्हणून..", कोणीतरी मस्करी करत बोललं.
"हो.. खरं तर घरातल्या घरात जोगवा ही पद्धतच चुकीची आहे..", आणखी एकजण.
"मग ब्राम्हणभोजन.. त्याबद्दल काय मत आहे?? तसंही दसऱ्याला असतंच ना.. मग आपण ठरवून रोज नऊ दिवस एका ब्राह्मणभोजन देऊ शकतो.."
"हम्म.. हे थोडं ठीक वाटतंय..".. सगळ्यांचं त्यावर एकमत झालं.
संध्याकाळी.. खेळायला गेलेली मुलं अन शॉपिंगला गेलेल्या मुली परतल्यानंतर त्यांना कुणकुण लागली, कि घरातली मोठी मंडळी यावेळेस नवरात्रीला नवीन काहीतरी करण्याचं ठरवत आहेत.. आणि त्यांनी दररोज ब्राह्मणभोजन द्यायचं ठरवलंय..
त्यांनीही आपली एक मीटिंग बोलावली अन त्यावर चर्चा करत, नवीन काही सुचवण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करू लागले.. शेवटी त्यांचंही एकमताने ठरलं..
रात्री सर्वजण एका ठिकाणी जेवायला जमल्यावर मुलांपैकी एकाने विचारलं, "काय मग? नवरात्रीत नऊ दिवस ब्राम्हणभोजन द्यायचं ठरवलंय म्हणे.. आम्हा मुलांना यावर काही सुचवायचं आहे.. म्हणजे तुम्हाला आवडलं, पटलं तरच ते अंमलात आणलं जाणार आहे.."
मोठी मंडळी कान देऊन ऐकत होती.. सर्वांची उत्सुकता ताणली गेली..
"आम्हा मुलांना वाटतं, कि आपण ब्राम्हणभोजनाऐवजी एखाद्या गरिबाला अन्नदान दिलं तर ते जास्त चांगलं राहील..म्हणजे रोज दारात भांडेवाली, कपडेवाली, दुधवाला, इस्त्रीवाला, भाजीवाला.. भरपूर लोक येतात.. त्यांना अन्नदान देणं म्हणजे एक पुण्यच आहे ना..!! आपणच म्हणता, कि माणसातला देव पाहायला हवा.. "
मोठी मंडळी कौतुकमिश्रित भारावलेल्या नजरेने मुलांना न्याहाळू लागली.. शेवटी संस्कार म्हणावेत ते हेच..!!
"खरंच चांगलं सुचवलंत रे पोरांनो.. नवरात्रच काय अगदी उद्या येणारी सर्वपित्री/दर्श अमावस्याही अशीच साजरी करू.. यावेळेसची नवरात्र खरोखरच एका वेगळ्या, नवीन आणि चांगल्या पद्धतीने साजरी होणार आहे.."
मला तर त्यांची ही पद्धत खूप आवडली.., कदाचित तुम्हालाही आवडली असेल..
छान छान ..
ReplyDelete