Wednesday, September 26, 2012

लकी प्लांट

 
 
खरं तर माझा 'फेंग शुई' किंवा तत्सम गोष्टींवर जास्त विश्वास नाहीये..
 
पण तरीही मी एक फेंग शुई प्लांट विकत घेतला.. झालं काय, कि माझ्या जुन्या, म्हणजे आधीच्या ऑफिसमध्ये क्युबिकल(बे एरिया) डेकोरेशनची स्पर्धा होती.. आणि आम्ही थीम निवडली होती "गो ग्रीन"..  त्यासाठीच मी हा प्लांट विकत घेतलेला.. म्हटलं ऑक्सिजन मिळेल तेवढाच.. यासोबत घेतलेले बाकीचे सगळे प्लांट्स माझे कलीग्स त्यांच्या घरी घेऊन गेले.. हा एकच शिल्लक राहिला म्हणून मी माझ्या डेस्कवर ठेवून घेतला.. तेव्हापासून मी अतिशय जपून काळजी घ्यायचे त्याची.. वाळलेली पाने काढून टाकणे, दर आठवड्याला पाणी बदलणे, दररोज एक-दोन तास ऑफिसच्या खिडकीत सूर्यप्रकाशात नेऊन ठेवणे, इ.इ. चालू असायचं माझं.. मी कधी सुट्टीवर असले कि माझे कलीग्स आणि मित्र-मैत्रिणी त्याची काळजी घ्यायचे.. सुट्टीवर असतानाही फोनाफोनी चालायची.. तेव्हा ते आवर्जून सांगायचे प्लांटला पाणी घातलं, खिडकीत ठेवून परत जागेवर आणून ठेवलं.. वगैरे वगैरे.. 
 
दोन महिन्यातच प्लांट दीड फुटापर्यंत वाढला.. आम्हा सगळ्यांना त्याची सवय झाली.. तसे पाहता डेस्कवर कोणी नसताना (रात्रीच्या वेळेस) उघड्यावर ज्या ज्या वस्तू ठेवल्या जात, मग ते पेन, ग्रीटिंग कार्ड, नोटबुक, पाणी पिण्याची बॉटल.. काहीही असो..  त्या दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येईपर्यंत गायब होत असत.. पण हा प्लांट आमच्या बे एरिया मध्ये अजूनही टिकून होता.. 
 
असो.. मी जुन्या ऑफिसमध्ये पेपर टाकला(रीजाईन केलं हो..).. ज्या दिवशी माझा त्या ऑफिस मधला शेवटचा दिवस होता, त्या दिवशी मी सगळ्यांशी भेटून-बोलू घेतलं.. माझ्या डेस्क मधली एक एक वस्तू प्रत्येकाने ठेवून घेतली.. त्यात टेडी, वेलकम करणारा डॉगी, काही आर्चिसचे ग्रीटींग्स आणि बरंच काही होतं (त्यांनी मला म्युझिक प्लेयर भेट म्हणून दिलं, त्याच्यापुढे तर मी दिलेल्या वस्तू नगण्यच... पण तरीही त्यांनी त्या मागून घेतल्या..)
 
राहता राहिला प्लांटचा प्रश्न.. मी माझ्या टीममेटला सांगितलं, कि 'तोपर्यंत हे तुझ्याकडे राहू दे.. सात आठ दिवसांनी मी घेऊन जाईन इथून..' तिने तो तिच्या डेस्कवर ठेऊन घेतला.. दहा-पंधरा दिवस झाले तरी ती बया प्लांट देण्याचं नावच काढेना.. मी सुद्धा थोड्या काळासाठी विसरून गेले त्याला..
 
एव्हाना संपूर्ण ऑफिसमध्ये तो प्लांट फेमस झाला.. आमच्या बे एरियातून जाणारा येणारा प्रत्येकजण तिथे थांबून बघायचा.. कारण तो खूप वाढलेला.. जवळ जवळ दोन फुट... मी गेल्यानंतर एक नवीन म्यानेजर जॉईन झाला.. तो त्या प्लांट ला पाहून माझ्या टीममेटला सारखा म्हणायचा.. "ये प्लांट तो बहोत अच्छा है.. मुझे ऐसाही प्लांट ला के दो ना.." मग ती म्हणायची, "ये मेरा नही.. वर्षाका प्लांट है..." त्यावर तो म्हणायचा, "अच्छा.. जब भी वर्षा आएगी , तो उसे बोल देना के मुझेभी ऐसाही प्लांट चाहिये.." त्या बिचाऱ्याला बरेच दिवस कळलं नाही कि ऑफिस सोडून गेलीये ते.. मी सुट्टीवर आहे, असंच समजायचा तो.. आणि माझे फ्रेंड्स त्याची उडवायचे अशीच..
 
त्यानंतर एक महिना झाला.. माझ्या टीममेटने सुद्धा पेपर टाकला.. ती सुद्धा तो प्लांट माझ्या दुसऱ्या कलीग कडे ठेवून गेली... तो त्याची काळजी घ्यायला लागला.. जेव्हा जेव्हा भेटे तेव्हा तेव्हा प्लांट बद्दल सांगत असे.. पण आणून काही देत नव्हता.. झालं.. पंधरा दिवसात त्याने सुद्धा पेपर टाकला.. आणि तो प्लांट गेला माझ्या टीमलीडरकडे... आश्चर्य म्हणजे एका महिन्याच्या आत त्याने रीजाईन केलं.. सगळे माझ्या प्लांट बद्दल बोलायला लागले, कि 'ज्या ज्या व्यक्तीकडे तो जातोय ती ती व्यक्ती इथून पेपर टाकून निघून जातेय..' आम्ही एकाच टीम मधले ५ जण आधीच बाहेर पडलोय..
 
मला तर एका क्षणासाठी वाटले कि माझ्या एवढ्या चांगल्या प्लांट ला काय झाले असावे.. (कोणी करणी वगैरे तर नाही न केली त्याच्यावर.. हा सुद्धा विचार डोक्यात येऊन गेला.. म्हटलं अकरा वेळेस वल्गा सूक्त म्हणून उतरवून टाकेन त्याच्यावरून..) असो.. जोक्स अपार्ट.. कसाही असला तरी आमच्यासाठी नक्कीच लकी ठरला होता.. आमची प्रगतीच(हाईक) झाली होती.. कोणासाठी लकी तर कोणासाठी वाईट.. म्हणजे आमच्यासाठी लकी तर आमच्या जुन्या ऑफिस साठी वाईट (वाईटच म्हणावे लागेल.. एकापाठोपाठ एक एम्प्लोयीज सोडून जाऊ लागल्यावर काय म्हणणार आणखी..)
 
पुन्हा काही दिवसांसाठी मी विसरून गेले त्याला.. कारण, मी नसले तरीही कोणी ना कोणी त्याची काळजी घेतंच राहील एवढं पक्कं माहितीये..
 
आज परत अचानक मला माझा प्लांट आठवला.. कारण काय तर माझा एक मित्र दुपारी फोन करून एक-दीड तास बोलला.. काय काय सुरुये मी आणि माझे टीममेट्स सोडून गेल्यावर, हे सांगत होता.. सगळं बोलून झाल्यावर शेवटी म्हणाला, "मी कशासाठी फोन केला, ते सांगायचंच राहून गेलं कि... मी हे सांगण्यासाठी फोन केला, कि आज मी पेपर टाकलाय.. आणि..." मी कानांत प्राण आणून ऐकत होते.. आणि तो बोलून गेला..
 
"आणि.. तुझा प्लांट माझ्याकडे आहे सध्या..."

1 comment: