दमडीचं तेल आणलं,
सासुबाईंचं न्हाणं झालं,
मामाजींची दाढी झाली,
भाऊजींची शेंडी झाली,
उरलं तेल झाकून ठेवलं,
लांडोरीचा पाय लागला,
वेशीपर्यंत ओहोळ गेला,
त्यात उंट वाहून गेला..
अजूनही थोडं थोडं आठवतं.. शाळेत असताना मराठी व्याकरणात शिकलेले छंद, वृत्त अन अलंकार.. त्यांची वैशिष्ट्ये अन उदाहरणं.. यमक, उपमा, रूपक, दृष्टांत, अतिशयोक्ती, उत्प्रेक्षा, इ.इ. अलंकार.. परीक्षेत अलंकारांवर एक प्रश्न हमखास असायचा, कुठलाही एक अलंकार देऊन त्याचे वैशिष्ट्य सांगून उदाहरण द्यायचे.. किंवा मग काही उदाहरणं दिली जायची, त्यांच्यावरून त्यात कोणता अलंकार आहे, हे ओळखायचे..
त्यातला माझा आणि माझ्या काही मैत्रिणींचा आवडता अलंकार म्हणजे अतिशयोक्ती.. "अतिशयोक्ती - जेव्हा एखाद्या वस्तूचे/गोष्टीचे वर्णन प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा चढवून/रंगवून सांगितले जाते, तेव्हा तो अतिशयोक्ती अलंकार असतो.." आणि त्याचे उदाहरण म्हणजे वर लिहिलेले गाणे.. मराठीतल्या अलंकारांची उदाहरणं लक्षात रहावीत म्हणून आमच्या बाजूच्या तुकडी मधल्या काही विद्यार्थ्यांनी प्रत्येक अलंकाराचे एक एक उदाहरण घेऊन त्यांच्या सुरेख चाली बसवून दिल्या होत्या..
दुसरी काही उदाहरणं म्हणजे, "एक तीळ सात भावंडांनी वाटून खाल्ला" किंवा मग "अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे" ही म्हण.. तशा बऱ्याचशा म्हणी आणि वाक्प्रचारांमध्ये अतिशयोक्ती केलेली आहे.. "रावणाच्या सैनिकांनी हनुमानाच्या शेपटीला चिंध्या बांधून त्याची शेपटी पेटवण्याचा प्रयत्न केला असता अख्खी लंका जळाली, पण शेवटी शेपूट काही जळालीच नाही.." अशी कितीतरी पाठ्य पुस्तकातली उदाहरणं आपण देऊ शकतो..
नववीच्या वर्गात शिकत असताना मराठीच्या सरांनी एकदा सर्व वर्गाला विचारले होते, "तुमचा मराठीतला सर्वांत आवडता अलंकार कोणता?" तेव्हा जास्तीत जास्त मुलींनी "अतिशयोक्ती" असे उत्तर दिले, त्यावर सरांनी दिलेला टोला - "बरोबर आहे.. शेवटी बायकाच त्या.. तुम्हाला कुठलीही बातमी अगदी कमी वेळात जगभर पसरवायची असेल, तर बायकांना सांगा.. वरून त्या जास्तीत जास्त तिखट-मीठ लावून, एकाचे चार करून सांगतील.." सरांनी केलेली अतिशयोक्ती ऐकून सर्व वर्गात हशा पिकला होता..
या अतिशयोक्तीमुळे माझ्या लहानपणी घडणारी आणखी एक गम्मत होती.. मी मावशीकडे शिकायला होते, त्यावेळी माझी लहान मावस भावंडं खूप खोड्या करायची.. संध्याकाळी मावशी देवाजवळ दिवा लावून आम्हाला जबरदस्ती "शुभं करोति.." म्हणायला लावायची.. ते म्हणत असताना त्यातल्या "दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी.." या ओळीपर्यंत जेव्हा यायचो, तेव्हा माझी भावंड मध्येच उठून, शुभं करोति अर्धवट सोडून, देवघरापासून दूर, घराच्या बाहेर असलेल्या तुळशीच्या वृंदावनापाशी जाऊन पहायची, देवघरात लावलेल्या दिव्याचा तिथे खरेच उजेड पडलाय का ते..!!
आजकाल अतिशयोक्तीचा वापर जगात सगळीकडेच होतोय.. मला तर आजकाल "अतिक्रमण" म्हणजे सुद्धा अतिशयोक्ती वाटत आहे.. म्हणजे रस्त्यावर, सरकारी जागेवर किंवा जागा मिळेल तिथे बांधकाम करणे अतिशयोक्ती नव्हे काय? (अतिशयोक्तीचा "आदर्श" असे कोण म्हटले रे ते?) असो.. अतिक्रमणच काय, सेल्स-मार्केटिंग, आयटी-सोफ्टवेअर क्षेत्रांमध्येही हे चालतंच कि राव.. आपल्याला स्पर्धेत टिकायचं असेल, तर आहे त्या पेक्षा कितीतरी रंगवून सांगायचे अन आपला कार्यभाग साधायचा, हेच तर चाललंय.. कमी भरतीला मेडियाही आहेच.. काहीही करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचं तंत्र मेडियावाल्यांना चांगलंच जमतं.. काय काय बातम्या दाखवत असतात.. काही दिवसांखाली एका न्यूज च्यानेलवर बातमी - "हेड लाईन : छज्जे पर चढी बिल्लो रानी.. कैसे नीचे उतरेगी छठे माले के छज्जे पर चढी हुई बिल्ली?" असेच काहीतरी दाखवत होते.. पण मी तर एका ठिकाणी वाचले होते, कि मांजराने दहा मजली इमारतीवरून उडी मारली तरीही मरत नाही म्हणून..
माझ्याच काय, तुमच्याही पाहण्यात बरीचशी अतिशयोक्तीची उदाहरणं असतील.. थोडक्यात काय तर आजकाल जगात सगळीकडेच अतिशयोक्ती चाललेली आहे.. मग या अतिशयोक्तीच्या पसाऱ्यात मी केलेली अतिशयोक्ती कशी वाटली, हे जरूर कळवा..
छान 👌
ReplyDeleteखूप सुंदर पद्धतीने अतिशयोक्ती अलंकार समजावून दिले.धन्यवाद
ReplyDelete