मुक्तपीठ मधल्या काही निवडक लेखांवर मी केलेली टिप्पणी..
(मुक्तपीठ मधल्या तमाम लेखकांची माफी मागून..)
सकाळ मधल्या मुक्तपीठातले लेख वाचून माझीपण खूप दिवसांची इच्छा होती, कि काहीतरी लिहायचे; पण काय लिहावे तेच सुचेना.. म्हटले, एखादे प्रवास वर्णन लिहावे, पण असे एकही ठिकाण सापडले नाही ज्याबद्दल आधी मुक्तपीठ मध्ये लिहिले नसेल.. बरे, अमेरिका, युरोप, चीन एवढेच काय अंटार्क्टिका सुद्धा (स्वप्नांत) मी फिरून आले, पण तरीही मला वेगळे असे लिहिण्यासारखे सापडलेच नाही.. (चंद्रावर जायचे राहूनच गेले.. म्हणून असेल कदाचित..)
मग काय, मी शिकवणी लावली ती मुक्तपीठ मध्येच लेख लिहिलेल्या एका शिक्षिकेकडे.. त्या मला त्यांच्या सगळ्या जुन्या-नवीन विद्यार्थ्यांच्या गाठी-भेटी घडवून आणायच्या.. पण हाय रे दैवा.. एक दिवस त्यांच्या बदलीची लाट आली अन त्या दुसऱ्या शहरात राहायला गेल्या.. परत माझी लेख कशावर लिहू याबद्दल शोधाशोध सुरु झाली.. मग मी कचऱ्यातून बाग फुलवावी अन त्यावर लेख लिहावा असा विचार केला.. आता आमच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत कुठे आली एवढी जागा..!! म्हटले, गच्चीवर करुया.. त्यासाठी गच्चीवर कचरा जमा केला, घरातले सांडपाणी सुद्धा नेउन टाकले.. पण थोड्याच वेळात बाकीच्या सदनिकेतले लोक आले.. "गच्ची मोकळीच असायला हवी.. इथे बाग फुलवता येणार नाही.." असे बोलल्यावर मी काय करणार.. सगळा कचरा साफ करून गच्ची स्वच्छ झाडून, धुवून काढावी लागली.. एवढे सगळे करण्यात मान-पाठ एक झाली.. हा ही प्रयोग फसला..
शेवटी कुठेतरी एका वाचकाची प्रतिक्रिया वाचून समजले, कि ताम्हिणी घाटातून दिवेआगरला गेल्यावर म्हणे नवनवीन काल्पनिक लेख सुचतात.. मग ठरवले कि हे सुद्धा करून पहावे.. त्यासाठी आधी बेंगलोरहून पुण्याला निघाले.. एअरपोर्टला जाण्यासाठी कार हायर केली, तर कारचा एसी व्यवस्थित चालू होता, डिकी पण व्यवस्थित उघडत होती, त्याची चावी पण ड्रायव्हरकडे होती अन गाडीही कुठेच बंद पडली नाही.. पण बाहेर स्नो फाल होण्याचे काहीच चिन्ह नव्हते.. उलट लख्ख ऊन, गरम वातावरण.. असे असतानाही विमान निघून गेले.. पण मी बस ने जाणार होते आणि माझी बस एअरपोर्टजवळून सुटणार होती..
असो.. प्रवासात असताना रात्र होती, म्हणून मी झोपले अन त्यामुळे विशेष काही अनुभव आला नाही.. बसमध्ये कुठलातरी भंकस मुव्ही लावला होता, अन बस ज्या ठिकाणी थांबायची तिथे अजिबातच स्वच्छता नव्हती.. तर मग सकाळी तब्बल चौदा तासांनी मी पुण्यात पोचले..
आता प्रश्न होता, ताम्हिणी घाटात कसे जायचे..? मी इकडे तिकडे चौकशी करून, विचारून पहात होते, तेव्हा कोणीतरी मला सांगितले कि एक सद्गृहस्थ आहेत जे स्त्रीदाक्षिण्य म्हणून प्रत्येक मुलीची मदत करतात.. पण मला हे ही कळले, कि ते केवळ युनिव्हर्सिटीपर्यंतच त्यांच्या लुनावरून लिफ्ट देतात.. मग मी त्या काकांना(आता वय झाले त्यांचे) माझी परिस्थिती समजावून सांगितली अन काय आश्चर्य..!! ते एकदम तयार झाले मला ताम्हिणी घाटात घेऊन जायला.. पण त्या बदल्यात मला त्यांना चार हजार रुपये द्यावे लागले ना राव.. पूर्वी एकदा म्हणे एका मुलीने त्यांचे चार हजार रुपये लंपास केले होते, तेव्हापासून ते प्रत्येक मुलीकडून आधी चार हजार रुपये मागतात अन मगच लिफ्ट देतात..
मग लुनावरून मजल-दरमजल करत आमचा प्रवास सुरु झाला ताम्हिणी घाटाकडे.. वाटेत कितीतरी जंगली श्वापदं दिसली.. वाघ, हत्ती, हरीण, इ. इ. पण लुनाला पाहून ते आपला रस्ता बदलत होते आणि आपण लुना-चालकाला दिसू नये या भीतीपोटी सापडेल त्या दिशेला लपण्यासाठी पळत होते.. नंतर कळले, कि ते प्राणी लुनाला नाही, तर पर्यटकांना पाहून पळत होते, त्यांना पाहण्यासाठी म्हणे विदेशी, फारेन-रिटन, अमेरिकेतले, असे कुठले कुठले पर्यटक आले होते.. आता आपले भारतीय प्राणी त्यांना बघून डिवचल्या जातीलच कि हो..
सरते शेवटी आम्ही ताम्हिणी घाटात पोहोचलो.. मागे एक कुटुंब तिथून जात असताना गाडीत पाठीमागे टाकलेला क्रिकेटचा बॉल घरंगळत ड्रायव्हरच्या साईडला, ब्रेकच्या खाली आला होता आणि हे ती मंडळी पुण्याकडे येत असताना घडलं होतं म्हणे.. यावर एका वाचकाने सांगितले होते, कि ताम्हिणी घाटातून पुण्याकडे येताना चढ लागतो.. एव्हाना मी मला काही लिहिण्यासाठी सुचेल कि नाही या विचारांच्या चढ-उतारात एवढी हरवले होते, कि पुण्याहून जाताना घाटात चढ लागतो कि उतार हे बघायचे राहूनच गेले.. पण तो क्रिकेटचा बॉल तिथेच कोपऱ्यात पडलेला दिसला.. यावर तो बॉल ब्रेकखाली कसा आला असेल याचे प्रात्यक्षिक करून पाहण्यासाठी आम्ही थांबलो.. मी लुनावरून उतरले अन माझे लक्ष अचानक माझ्या डाव्या बाजूला गेले.. हे काय? किती मोठी खोल दरी..!! एक पाऊल जरी मी थोडे दूर टाकले असते, तर मी थेट दरीतच पडले असते.. मग घाबरून मी उजव्या बाजूला वळले, तर माझे डोके डोंगरावर आपटले.. उजवीकडे डोंगर अन डावीकडे दरी.. आम्हाला काही सुचेना म्हणून आम्ही तिथून पुढे निघालो..
थोडे पुढे गेल्यावर लुना बंद पडली, पेट्रोल संपले होते.. आजूबाजूला मदत मिळेल असे काहीच नव्हते.. आम्ही लुना तशीच ढकलत ढकलत पुढे नेत होतो.. जाता जाता येणाऱ्या गाड्या थांबवायचा प्रयत्न करत होतो.. पण जाणारे-येणारे लोक लुनावाल्या काकांना ओळखत असावेत कदाचित.. कारण ते मदत करायची सोडून गाडी थांबवून त्यांना मुक्तपीठ मध्ये लेख लिहिल्याबद्दल शिव्या देत होते अन पुढे निघून जात होते.. थोडे पुढे आणखी एक कार बंद पडलेली दिसली.. त्यांची चौकशी केल्यावर कळले, कि त्यांच्या गाडीचा पेट्रोल फिल्टर गळून पडला होता आणि म्हणून त्यांच्या गाडीतले सर्व पेट्रोल सांडून गेले होते.. पण लुनाला तर पेट्रोल फिल्टरच नव्हते.. मग काय माझा पारा चढला.. काकांनी लुनाला पेट्रोल फिल्टर बसवून न घेतल्यानेच सगळे पेट्रोल संपले होते अन आमची फजिती झाली होती.. मी भांडले अन बेंगलोरला परत जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगितले.. त्यावर स्त्री-दाक्षिण्य म्हणून त्यांनीही अजिबात कूरकूर न करता माझे चार हजार रुपये मला परत केले..
झाली ती फजिती खूप झाली अन ताम्हिणी घाटात जाऊनही गाडी बंद पडल्याने पुढचा प्रवास थांबला अन मला लिहिण्यासारखे काहीच मिळाले नाही म्हणून माझा भ्रमनिरास झाला.. शेवटी पुढे कुठलाही विचार न करता मी लुनाला अन काकांना घाटातच सोडून परतले.. आता काय लिहावे म्हणून विचार करत होते, तेवढ्यात माझा फोन वाजला अन माझ्या पुण्यातल्या मित्र-मैत्रिणींकडून पुण्याहून दिवेआगरला जाण्याचे ट्रीपचे आमंत्रण आले.. यावेळेस आम्ही गाडी ताम्हिणी घाटातूनच जाईल आणि गाडीला पेट्रोल फिल्टर असल्याची खात्री करून घेत, थोडेसे पेट्रोल जवळ ठेवून, गाडी कुठेही बंद पडणार नाही याची खातरजमा करून घेतलीये.. बघू, आता यावेळेस ताम्हिणी घाटातून जाताना मला लिहिण्यासाठी काही सुचते का ते..
No comments:
Post a Comment